विवेकानंद जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:54+5:302021-02-05T08:31:54+5:30

हिवरा आश्रम (बुलडाणा): दरवर्षी माेठ्या उत्साहात साजरा हाेणारा स्वामी विवेकानंद जन्माेत्सव यावर्षी काेराेनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. ...

Vivekananda Janmotsav will be celebrated in a simple manner | विवेकानंद जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा हाेणार

विवेकानंद जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा हाेणार

हिवरा आश्रम (बुलडाणा): दरवर्षी माेठ्या उत्साहात साजरा हाेणारा स्वामी विवेकानंद जन्माेत्सव यावर्षी काेराेनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान हाेणारी महापंगत, यात्र आणि मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. दर्शनासाठी मर्यादित उपस्थितीत हाेणाऱ्या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रेक्षपण करण्यात येणार आहे.

विवेकानंद आश्रम या धर्मादायी संस्थेची स्थापना करणारे शुकदास महाराज यांनी सुरू केलेला हा महोत्सव देश विदेशातील लाखाे भाविकांच्या श्रद्धेचे व आकर्षणाचे केंद्र बनला आहे. तीन दिवस नामवंतांची व्याख्याने,प्रवचने व प्रबोधनाचे कार्यक्रम हे या उत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये असते. शेवटच्या दिवशी लाखो भाविकांना अन्नदानाचा सोहळा डाेळ्याचे पारणे फेडणारा असतो. जवळपास दोन लाख भाविक, दोन हजार स्वयंसेवक,महाप्रसादांनी भरलेली शंभर ट्रॅक्टर असे अन्नदान साेहळ्याचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी २, ३ आणि ४ फेब्रुवारीला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत मर्यादित उपस्थितीत हा उत्सव संपन्न होत आहे. महाेत्सवात नामवंत प्रबोधनकारांना,कलावंतांना निमंत्रित केले असून त्यांचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने व केबल नेटवर्कद्वारे प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी व उत्सवासाठी भाविकांनी गर्दी करू नये. घरी राहूनच कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आश्रमाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे. यावर्षी महापंगत,यात्रा,मिरवणूक,भजनी दिंड्यांचा सहभाग इत्यादी कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.

व्याख्यानांचे ऑनलाईन प्रक्षेपण

ऑनलाईन कार्यक्रमात श्रीपाल सबनीस,उत्तम कांबळे,भास्कर पेरे पाटील, चारूदत्त आफळे,पंजाब डख,न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील,हरीचैतन्य स्वामी,प्रकाश महाराज जवंजाळ,गजाननदादा शास्त्री,उध्दवराव गाडेकर,संजय महाराज पाचपोर,कृष्णचैतन्यपुरी,संदीपान महाराज यांच्यासह अनेक नामवंत ज्ञानयज्ञात सहभागी होणार आहेत.

भाविकांमध्ये नाराजी

राजकीय पक्षाच्या सभांना व लग्न कार्यात होणारी गर्दी पाहता प्रबोधनांच्या कार्यक्रमांना व धार्मिक उत्सवांना शासनाच्या नियमांचे लगाम कशाला असा सवालही परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जयंती महोत्सवाची जय्यत तयारी आश्रमातर्फे सुरू होती. त्यासाठी विविध समित्यांचे गठन व कामांचे नियोजन,भाविकांची निवास व भोजन व्यवस्था,परिसर स्वच्छता,सॅनिटायिझेशन इत्यादी बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू होते. मात्र, आश्रमाच्या व्यवस्थापनाने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Vivekananda Janmotsav will be celebrated in a simple manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.