करमोडा गावात सौर ऊर्जेसह ग्रामस्थांचा विमा
By Admin | Updated: September 2, 2015 02:28 IST2015-09-02T02:28:12+5:302015-09-02T02:28:12+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक; सांसद आदर्श ग्राम योजनेवर झाली चर्चा.

करमोडा गावात सौर ऊर्जेसह ग्रामस्थांचा विमा
बुलडाणा : करमोडा या गावांमध्ये होणार्या विकास कामांमुळे गावाचा कायापालट करणार आहोत. या गावांमध्ये सौर उर्जेवर आधारित पथदिवे बसविण्यात येणार असून, पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेंतर्गत गावातील पात्र कुटुंबप्रमुखांचा विमा उतरविण्यात येणार असल्याची ग्वाही खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली. सांसद आदर्श ग्राम योजना आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, येथील महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेतून शिलाई मशीन दिल्या जाईल. तसेच प्रत्येक कुटुंबाला रेडिमेड शौचालय स्वच्छ भारत अभियानांतर्गत बसवून देऊन त्यासाठी गावात तीन प्रकारच्या शौचालयांचे मॉडेलही गावकर्यांच्या निवडीसाठी उपलब्ध करून दिल्या जाईल. ही सर्व कामे दर्जेदार व गावाला आदर्शपण देणारी असावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांनी करमोडासारख्या आदिवासीबहुल गावाचा समावेश केला आहे. या गावांना आदर्श बनविण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांच्या एकत्रिकरणातून गावांमध्ये सर्व विभागांच्या समन्वयाने विकास कामे सुरू आहेत. गावाला आदर्शपण देण्यासाठी ही सर्व सुरू असलेली कामे विहीत मुदतीत पूर्ण करावी, असे आदेश सर्व यंत्रणेला दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा नियोजन अधिकारी सेडाम, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.