पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-26T23:45:10+5:302014-06-27T00:27:40+5:30
देऊळगावराजा तालुक्यातील प्राथमिक शाळेला शाळा व्यवस्थापन समितीने पहिल्याच दिवशी कुलुप ठोकले.

पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप
देऊळगावराजा : कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती आणि इयत्ता ५ वीचा वर्ग सुरू करा या दोन्ही मागण्या पुर्ण न झाल्याने तालुक्यातील तुळजापूर जि.प. मराठी प्रर्थमिक शाळेला ग्रामपंचायतचे पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीने गुरूवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलुप ठोकले. सलग तिसर्या वर्षी हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे आज सर्वत्र विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत होत असताना येथील चिमुरड्यांना मात्र शाळेच्या प्रवेशद्वारावरूनच निराश होत परत जावे लागले.
येथील जि.प.प्र्थमिक शाळेत शिक्षक देविदास खरात, प्रभाकर वाघ यांच्या बदलीसाठी तीन वर्षापासून सातत्याने मागणी होत आहे. त्यांच्या जागेवर तात्पुरती शिक्षकांची नियुक्ती नको तर कायमस्वरुपी शिक्षक द्या, ईयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करा या मागण्या तीन वर्षापासून असताना त्यावर निर्णय का घेतल्या जात नाही हा प्रश्न आहे. अखेर संतप्त होऊन सरपंच गोपिचंद कोल्हे, उपसरपंच, शाळा समितीच्या अध्यक्षा चंद्रकला तिडके, उपाध्यक्ष विद्या कांबळे यांच्यासह गजानन कांबळे, शाम जाधव, बाबासाहेब कोल्हे, शिवाजी कांबळे, भगवान तिडके, भास्कर कोल्हे, रंगनाथ कोल्हे यांनी शाळेला कुलुप ठोकले. दरम्यान घटनेची माहिती शिक्षकांनी शिक्षण विभागाला कळविली. त्यानंतर प्रभारी गटशिक्षण अधिकारी ए.पी. चव्हाण यांनी शाळेला भेट देवून शाळा समितीच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. मात्र अखेर पर्यंत तोडगा निघाला नव्हता.