प्रचारकार्यात वाहनांची झाली गर्दी
By Admin | Updated: October 10, 2014 00:17 IST2014-10-10T00:17:21+5:302014-10-10T00:17:21+5:30
बुलडाणा विधानसभा क्षेत्रात १४४ वाहनांकरिता परवानगी.

प्रचारकार्यात वाहनांची झाली गर्दी
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच मतदारांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. या प्रचारकार्यामुळे शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी झाली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने बुलडाणा विधानसभा क्षेत्रासाठी दहा उमेदवारांसाठी १४४ वाहनांची परवानगी दिली आहे. मात्र, सर्वच उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना या वाहनांसाठी खिसा रिकामा करावा लागत आहे. प्रचारात वाहनांची मोठी मागणी असते. काही उमेदवारांकडे स्वत:च्या, पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा असतो. युती व आघाडी तुटल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. वाढलेले उमेदवार व वाहनांच्या र्मयादित संख्येचा अंदाज घेऊन वाहनमालकांनी किरायाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे शहरातील संगम चौक येथील वाहनतळावर सध्या शुकशुकाट दिसत आहे. सध्या शहरात भाडोत्री वाहनांचा दुष्काळ झाला असून, बहुतांश वाहने विविध विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचारकामात गुंतली आहेत. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उमेदवारांपैकी कोणाची दिवाळी कशी असेल, हे सांगणे आज कठीण असले तरी उमेदवारांच्या संख्येमुळे किरायाने वाहन देणार्या वाहनमालकांची सध्या जोरात दिवाळी सुरू आहे, एवढे मात्र नक्की.