कार व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक
By Admin | Updated: April 25, 2017 00:33 IST2017-04-25T00:33:12+5:302017-04-25T00:33:12+5:30
लोणार- भरधाव येणाऱ्या कार व लोणारहून मेहकरकडे जाणाऱ्या रेती वाहनाची जोरदार धडक झाल्याने कारमधील युवक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

कार व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक
लोणार : शारा गावाजवळील वळणावर २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मेहकरकडून भरधाव येणाऱ्या कार व लोणारहून मेहकरकडे जाणाऱ्या रेती वाहनाची जोरदार धडक झाल्याने कारमधील युवक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना लोणार ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
लोणार तालुक्यातील शारा गावाजवळील वळणावर २४ एप्रिल रोजी सायंकाळी लोणारहून मेहकरकडे रेती भरून भरधाव जाणाऱ्या एम.एच.२० एटी ९८६ या वाहनाची व मेहकरहून लोणारकडे येणाऱ्या एमएच २८ -१०२० या कारची जोरदार धडक झाली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघात घडताच गावाजवळील नागरिकांनी रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावून घेतले. अपघात घडताच रेती वाहनाच्या चालकाने तेथून पळ काढला. अवैध रेती वाहनधारकाच्या संख्येत वाढ होत असल्याने असे अपघात नेहमीच घडत आहेत. याकडे मात्र संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. कारमधील अमोल खोडके, छोटू नरवाडे, अनिल इंगळे, सोनू गायकवाड, आकाश खरात यांच्यावर लोणार ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खोब्रागडे, पोहेकॉ रवींद्र इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मार्ग मोकळा केला. वृत लिहेपर्यंत लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.