भाजीपाल्यातून आजारांचा प्रादुर्भाव!
By Admin | Updated: June 20, 2016 02:02 IST2016-06-20T02:02:10+5:302016-06-20T02:02:10+5:30
बुलडाणा शहरातील भाजीबाजारात कमालीची अस्वच्छता.

भाजीपाल्यातून आजारांचा प्रादुर्भाव!
बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, ठिकठिकाणी डबके साचले आहेत. या डबक्यांच्या शेजारीच रविवारी भरलेल्या बाजारात भाजीपाल्याची विक्री होत असून, यामुळे आजारांचा पुरवठा होत आहे.
दर रविवारच्या आठवडी बाजारात बुलडाणा तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकही येतात. शहरातील जयस्तंभ चौक ते सराफा गल्लीशिवाय स्टेट बँक चौक ते कारंजा चौक या भागात रविवारी बाजार भरतो. शुक्रवारी रात्री शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या ठिकाणी सध्या मोठमोठे डबके साचले असून, चिखल निर्माण झाला आहे.
या डबक्यांच्या बाजूनेच भाजीपाल्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. भाजी बाजारात जिल्हाभरातून भाजीपाला विक्रेते येऊन दुकाने थाटतात. दिवसभर या ठिकाणाहून भाजीपाल्याची विक्री करण्यात आली.पावसाळ्यामध्ये जलजन्यसह अन्य आजारांचा प्रकोप वाढतो. डबक्यांमधील विषाणू इतरत्र पसरत असतात. बाजूलाच असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये विषाणूंचा प्रसार होतो. हाच भाजीपाला नागरिक खरेदी करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन भाजीपाला विक्रीसाठी जागा देऊन स्वच्छता करण्याची नितांत गरज आहे.