भाजीपाला खरेदीदारांचा खरेदीवर बहिष्कार!
By Admin | Updated: July 21, 2016 23:49 IST2016-07-21T23:49:34+5:302016-07-21T23:49:34+5:30
चिखली येथे बाजार समिती व ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने थेट बाजारात विक्री.

भाजीपाला खरेदीदारांचा खरेदीवर बहिष्कार!
चिखली (जि. बुलडाणा) : शासनाने फळे, भाजीपाला व मसाल्याचे पदार्थ नियमनमुक्त करून अडतमुक्तीचा निर्णय घेतला असल्याने इतके दिवस शेतकर्यांच्या मालाला मनमानी भाव देऊन अडत वसूल करणार्यांना हा निर्णय चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याचे पडसाद २१ जुलै रोजी चिखली बाजार समितीच्या यार्डात दिसून आले. मार्केट यार्डातील सर्व खरेदीदारांनी संघटितपणे भाजीपाला खरेदीवर बहिष्कार टाकून शेतकर्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, ऐनवेळी शेतकर्यांच्या मदतीसाठी बाजार समिती प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते धावून गेल्याने शेतकर्यांचा माल खरेदीदारांविना विकल्या गेला. या माध्यमातून शेतकर्यांना चांगला भाव तर मिळालाच उलटपक्षी खरेदीदारांनाही तोंडघशी पडावे लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणाखाली चालत असलेल्या भाजीबाजारामध्ये आजवर अडत्यांद्वारे शेतकर्यांकडून भाजीपाला, फळे व मसाल्याच्या वस्तूंवर १0 टक्के अडत घेतली जात होती. यातून शेतकर्यांची मुक्तता करण्यासाठी शासनाने फळे, भाजीपाला नियमन मुक्त केल्याने खरेदीदारांनी २१ जुलै रोजी येथील मार्केट यार्डात दाखल झालेल्या भाजीपाला व फळे आदी शेतमाल खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला होता. तसेच यामध्ये बाजार समितीने मध्यस्थी करून अडत रद्द करावी, असा सूर खरेदीदारांनी आळवला. यादरम्यान गोंधळ उडाल्याने शेतकर्यांकडून तीव्र रोष व्यक्त केल्या जात होता. याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तातडीने बाजार समितीत दाखल झाले. खरेदीदारांनी थेट शेतकर्यांकडून माल खरेदी करावा, असा पावित्रा घेतल्याने बाजार समितीनेही पुढाकार घेतला. दरम्यान बाजार समितीने खरेदीदारांनी व्यापार्याला केवळ सहा टक्के अडत देण्याची मुभा दिली. तोडगा न निघाल्याने अखेर बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील यांनी समितीच्या कर्मचार्यांमार्फत शेतकर्यांचा माल थेट बाजारात विक्रीसाठी पाठवून स्वाभिमानी व बाजार समितीच्या कर्मचार्यांच्या मदतीने थेट बाजारात हा माल विकल्या गेला. सभापती विष्णू पाटील व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी खरेदीदारांना न जुमानता शेतकर्यांसाठी पुढाकार घेतल्याने थेट बाजारात गेलेल्या शेतमालाला चांगला भावदेखील मिळाला.