निवडणुकीच्या धर्तीवर राहणार लसीकरण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:44+5:302020-12-30T04:43:44+5:30

बुलडाणा : कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना ...

Vaccination program will be on election lines | निवडणुकीच्या धर्तीवर राहणार लसीकरण कार्यक्रम

निवडणुकीच्या धर्तीवर राहणार लसीकरण कार्यक्रम

बुलडाणा : कोविड या साथरोगाच्या नियंत्रणासाठी लवकरच लसीकरण देशात सुरू होणार आहे. या लसीकरणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अपर पोलीस अधीक्षक बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद यांनी सादरीकरण केले. सादरीकरणावेळी ते म्हणाले, लसीकरण टप्पेनिहाय करण्यात येणार आहे. सर्वांत प्रथम हेल्थ वर्करमध्ये डॉक्टर, नर्सेस, सर्व खासगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर यामध्ये कोविड कालावधीत काम केलेले पोलीस अधिकारी-कर्मचारी, महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य विभागांतील अधिकारी व कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील सर्व लोक, त्यानंतर चौथ्या टप्प्यात ५० वर्षांच्या आतील दुर्धर आजार असलेले नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. मात्र लसीकरणासाठी को विन ॲपवर नोंदणी आवश्यक आहे. सर्व खासगी डॉक्टर, नर्सेस त्यांचा स्टाफ, यंत्रणेतील हेल्थ वर्कर, पोलीस, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांची नोंदणी करावी. लसीकरण स्थळ हे तीन भागांत असावे. यामध्ये पहिल्या भागात प्रतीक्षा खोली, दुसऱ्या भागात प्रत्यक्ष लसीकरण खोली, तर तिसऱ्या भागात निरीक्षण खोली असणार आहे. निरीक्षण खोलीमध्ये ३० मिनिटांपर्यंत लसीकरण केलेल्या व्यक्तीला ठेवण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या मोबाइलवर तारीख, स्थळ व वेळेचा एसएमएस पाठविण्यात येणार आहे. दुसऱ्या डोजसाठी एसएमस पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधीक्षक, संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Vaccination program will be on election lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.