रिक्त पदांमुळे नगर पंचायतचा कारभार विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:14+5:302021-04-24T04:35:14+5:30
माेताळा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने नगर पंचायत प्रशासनाची उपाय याेजना करण्यासाठी दमछाक हाेत ...

रिक्त पदांमुळे नगर पंचायतचा कारभार विस्कळीत
माेताळा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने नगर पंचायत प्रशासनाची उपाय याेजना करण्यासाठी दमछाक हाेत आहे़ त्यातच ३८ मंजूर पदांपैकी तब्बल २२ पदे रिक्त असल्याने नगर पंचायतचे कामकाज विस्कळीत झाले आहेत़
मोताळा नगरपंचायतमध्ये एकूण ३८ पदे मंजूर आहे. त्यापैकी केवळ १६ पदे भरण्यात आली आहेत. तर महत्वाच्या पदांसह तब्बल २२ पदे रिक्त आहे. भरलेल्या १६ पदांपैकी एक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे. कर्मचाऱ्यांची वाणवा असल्यामुळे नागरिकांना कामासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्त पदांचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडत आहे.
माेताळा शहराची लोकसंख्या वाढत असून येथील लोकसंख्येने दहा हजारांचा आकडा केव्हाच पार केला आहे. ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाल्याने स्वच्छतेविषयी व शहराच्या विकासाबाबतीत असलेल्या समस्या कायम आहेत़ नागरिकांना नगरपंचायत मधील कामांसाठी चकरा मारूनही त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथील एका कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन विभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार वाढत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका कामाकडे पूर्णपणे लक्ष देता येत नाही. त्यामुळे शहरातील समस्यांकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी शहरातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील नागरिकांना बहुतांश सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना व आदेशाचे पालन करून जिल्हा प्रशासनाने लावलेले निर्बंध न पाळणाऱ्या तसेच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी कर्मचारी अपुरे पडत आहेत. नगर पंचायतच्या मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे या काेराेना पाॅझिटिव्ह असल्यामुळे गत दीड महिन्यापासून रजेवर हाेत्या़ त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. परंतु आता मुख्याधिकारी कामावर रुजू झाल्याने कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ही पदे आहेत रिक्त
लिपिक टंकलेखकाची चार पदे, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक एक पद, पंप ऑपरेटर, वीजतंत्री जोडारी तीन, वायरमन एक, मुकादम दोन, स्वच्छता निरीक्षक एक, लेखापाल एक, नगर रचनाकार एक, तसेच पाणीपुरवठा व मलनिस्सारण अभियंत्याचे एक पद रिक्त, सफाई कामगार सात अशी एकूण बावीस पदे रिक्त आहेत.