बुलढाणा : जिल्ह्याला चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले
By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 29, 2023 18:11 IST2023-04-29T18:11:21+5:302023-04-29T18:11:33+5:30
अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे.

बुलढाणा : जिल्ह्याला चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले
बुलढाणा : जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले. २९ एप्रिल रोजी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने परिसरातील भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यात गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दररोज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. सध्या शेतामध्ये उन्हाळी मूग, भुईमूग, कांदा, बिजोत्पादनाचा कांदा, मका, भाजीपालावर्गीय पिके आहे. यंदा सिंचनाची चांगली व्यवस्था असल्याने ही सर्व पिके चांगली बहरलेली आहेत. परंतु या अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुलढाणा तालुक्यात अनेक ठिकाणी मका पीक जमीनदोस्त झाले. या अवकाळी पावसाचा फळबागांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
हळद पिकाचे नुकसान
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळद पीक घेतले आहे. सध्या हळद पीक काढणीचा हंगाम सुरू आहे. काहींनी हळद पीक काढून शेतात वाळवत घातले आहे. परंतु या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे हळद पिकाचे नुकसान झाले आहे.