१२ हजार १०६ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा; मेहकर तालुक्यातील चित्र
By संदीप वानखेडे | Updated: December 3, 2023 17:17 IST2023-12-03T17:13:43+5:302023-12-03T17:17:33+5:30
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

१२ हजार १०६ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा; मेहकर तालुक्यातील चित्र
संदीप वानखडे, मेहकर (बुलढाणा): तालुक्यात २६ नाेव्हेंबर ते ३० नाेव्हेंबर दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे १२ हजार १०६ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. तालुक्यातील ११ पैकी ९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस आहे.
अवकाळी पावसामुळे ६९० हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे. २ हजार ४९० शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तसेच ४२ हजार १२० शेतकऱ्यांच्या १ हजार १०० हेक्टवरील तूर पिकाचे नुकसान झाले. २६ हेक्टरवरील करडई पिकालाही अवकाळीचा फटका बसला आहे. २९० हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, एक हजार १० शेतकरी बाधित झाले आहेत. तालुक्यातील ४५ हजार ६७५ शेतकऱ्यांच्या १२ हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील पिके जमीनदाेस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर व तहसीलदार नीलेश मडके यांनी तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आ. संजय रायमुलकर, तहसीलदार नीलेश मडके यांनी मेहकर तालुक्यातील नांद्रा धांडे येथे जात स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.