विनापरवाना लाकडाची वाहतूक
By Admin | Updated: January 7, 2016 02:17 IST2016-01-07T02:17:32+5:302016-01-07T02:17:32+5:30
४0 हजारांचा माल जप्त; खामगाव वनपरिक्षेत्र विभागाची कारवाई.

विनापरवाना लाकडाची वाहतूक
खामगाव : गाढवावरून विनापरवाना जळतन वाहतूक करताना आठ गाढवे पकडून सुमारे ४0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामधील आरोपी पसार झाले आहेत. ही कारवाई बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्र विभागाने केली. खामगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या माटरगाव वतरुळातील झोडगा बीट १ कं.नं. २१९ मध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास वनपाल एस.वाय. बोबडे, जे.एस. सोनोने, ए.बी. वानखडे, आर.सी. देठे, बी.आर. गवळी, एस.एस. सावळे हे गस्त करीत असताना त्यांना आठ गाढवांवरून अंजनाच्या जळतनाची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. यावेळी गाढवे व सात क्विंटल जळतन असा एकूण ४0 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय वनअधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक बी.टी. भगत, सहायक वनसंरक्षक बी.एन. पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये वनकर्मचारी बोंबटकार, पवार, लोधी, सरोदे यांचा सहभाग होता. घटनेचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक टी. एन. साळुंके करीत आहेत.