अतिक्रमकांना ‘अल्टिमेटम’

By Admin | Updated: December 10, 2014 00:49 IST2014-12-10T00:49:25+5:302014-12-10T00:49:25+5:30

बुलडाणा पालिका प्रशासन अलर्ट : शहर परिसरात गुरुवारपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई.

'Ultimatum' to encroachers | अतिक्रमकांना ‘अल्टिमेटम’

अतिक्रमकांना ‘अल्टिमेटम’

बुलडाणा : विविध राजकीय पदाधिकार्‍यांच्या आशीर्वादाने बुलडाणा शहरात अतिक्रमण करणारे माफिया फोफावले आहेत. काहींनी निवडणूक आचारसंहितेचा गैरफायदा घेऊन विविध चौकात तसेच शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करून त्या जागेत दुकाने किंवा घरे तात्पुरते उभारून भाड्याने देण्याचा तसेच विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता; मात्र अतिक्रमणाचा गोरखधंदा बंद होणार असून, नगरपालिका प्रशासनातर्फे गुरुवारनंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुलडाणा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्याप्रमाणात अतिक्रमणात वाढ होत आहे. या अतिक्रमणाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यामुळे शहराचे सौंदर्यीकरण लयास गेले आहे. लोकसंख्या व शैक्षणिक संस्था वाढल्यामुळे शहरात व्यवसाय वाढले आहेत. त्यामुळे विविध चौकातील मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटण्यासाठी स्पर्धा लागली आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी चिखली रस्त्यावरील सक्यरुलर रस्त्यावरील अतिक्रमण काही प्रमाणात काढण्यात आले होते. त्यावेळी अनेक अतिक्रमणधारकांना नोटीसेस देण्यात आल्या होत्या.
मात्र आचारसंहिता लागल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही स्थगित केली. त्यानंतर सर्व प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामात मग्न झाले. राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारीही निवडणुकीच्या कामाला लागले; मात्र काही राजकीय पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला नेहमीचा अतिक्रमणाचा व्यवसाय सुरूच ठेवला. उलट आचारसंहितेच्या नावाखाली शहरातील मोक्याच्या जागेवर अतिक्रमण सुरू केले आहे. शहरातील बर्‍याच भागातील अतिक्रमण यापूर्वीही काढण्यात आले होते; मात्र काही दिवस लोटताच पुन्हा अतिक्रमणधारकांनी आपली दुकाने थाटली. यामुळे कोणत्याही प्रकारचे लेखी न देता असे लाखो रुपयांचे व्यवहार दररोज पार पडतात.
मात्र आता अतिक्रमणाचा धंदा बंद होणार असून, पालिकेतर्फे गुरुवारनंतर शहरातील विविध भागात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

Web Title: 'Ultimatum' to encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.