एकच शेत दोघांना विकल्याप्रकरणी दोन वर्षांचा कारावास
By Admin | Updated: April 10, 2015 23:32 IST2015-04-10T23:32:58+5:302015-04-10T23:32:58+5:30
खामगाव तालुक्यातील प्रकार; न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा.

एकच शेत दोघांना विकल्याप्रकरणी दोन वर्षांचा कारावास
खामगाव (जि. बुलडाणा) : एकच शेत दोघांना विकल्याप्रकरणी तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील आरोपीस दोन वर्ष साधी कैदेची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला. सदरचा निकाल येथील न्यायालय क्र.१ चे न्यायाधीश आर.एम. ईरलीकर यांनी दिला.
तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील शेख सलीम शे. जलील याने त्याच्या मालकीचे गट नं. ६0२ मधील 0.८१ आर शेत १८ फेब्रुवारी २0१२ रोजी गावातीलच शेख सुजाउद्दीन शेख अल्लाउद्दीन ह.मु. ठाणे यांना ८४ हजार रुपयांत विकले होते.
तशी रितसर खरेदीसुद्धा करण्यात आली होती व तेच शेत ३१ डिसेंबर २0१३ रोजी शेख सलीम याने गावातीलच शेख सिद्दिकी शे. बुढन यांना विकले.
ही माहिती शेख सुजाउद्दीन यांना माहीत पडली. त्यानुसार त्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी आरोपी शेख सलीमविरुद्ध कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.
न्यायालयाने सदर प्रकरणात ७ साक्षीदार तपासले. साक्षीदाराची साक्ष व सरकारी अभियोक्ता संध्या इंगळे यांचा युक्तिवाद ग्राहय़ मानून आरोपीस कलम ४२0 मध्ये २ वर्ष साधी शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली.