एसटीबसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: October 29, 2014 23:02 IST2014-10-29T22:44:46+5:302014-10-29T23:02:04+5:30
खामगाव जालना महामार्गावर अंचरवाडी फाट्याजवळ अपघात.

एसटीबसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
चिखली (बुलडाणा): खामगाव जालना महामार्गावर अंचरवाडी फाट्यानजिक जालनाकडून येणार्या एसटी बसने समोरुन येणार्या दुचाकीला धडक दिल्याने बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील विजय भीमराव हिवाळे हा २८ वर्षीय युवक चिखलीहून जालनाकडे जात असताना या महामार्गावरील अंचरवाडी फाट्यानजिक समोरुन येणार्या औरंगाबाद-यवतमाळ या बसने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार विजय हिवाळे हा गंभीर झाला. एका व्यक्तीने त्याला मिळेल त्या वाहनाद्वारे स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले; मात्र त्याला वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जी.डी.भोई यांनी याप्रकरणी मृताच्या नातेवाइकांना माहिती देऊन पुढील सोपस्कार पूर्ण केले.
या महामार्गावर अपघात होऊन मृत्युमुखी पडणार्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे. २0 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथून जवळच असलेल्या मुरादपूर फाट्यानजिक अपघाताची घटना घडली होती.