ट्रॅक्टरची दुचाकीस धडक, चिमुकलीसह आईचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: May 30, 2023 16:29 IST2023-05-30T16:29:02+5:302023-05-30T16:29:50+5:30
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने आईसह मुलीचा मृत्यू झाला तर दाेन जण गंभीर जखमी झाले.

ट्रॅक्टरची दुचाकीस धडक, चिमुकलीसह आईचा मृत्यू
डोणगाव : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने आईसह मुलीचा मृत्यू झाला तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही घटना डाेणगाव ते आलेगाव रस्त्यावर ३० मे राेजी घडली. जखमींवर मेहकर येथे उपचार सुरू आहेत. परवीन बी उस्मान शाह व खुशी असे मृतक मायलेकींची नावे आहेत.
उस्मान शाह (रा. खिरपुरी, ता. बाळापूर) हे गत काही दिवसांपासून आपल्या कुटुंबासह डोणगाव येथे राहतात. ते ३० मे त्यांच्या आईला भेटण्यासाठी खिरपुरी येथे दुचाकी क्र. (एमएच २८ बीएन ४०८८) ने जात हाेते. दरम्यान, डाेणगाव ते आलेगाव रस्त्यावर जनुना फाट्यावर समाेरून गिट्टी घेऊन येणारा ट्रॅक्टर (एमएच २८ एजे ३९७३) ने दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये उस्मान शाह व त्यांची पत्नी परवीन बी उस्मान शाह, मुलगी खुशी (वय ३), नगमा (वय ७) हे गंभीर जखमी झाले. विश्वीवरून डोणगावला येणारे नवाज कुरेशी यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
उपचारासाठी नेत असतानाच खुशी हिचा गाेहगावजवळ मृत्यू झाला. तसेच तिची आई परवीन बी यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डाेणगाव पाेलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.