दुचाकीची बैलगाडीला धडक; दोन जण ठार
By Admin | Updated: January 7, 2016 02:20 IST2016-01-07T02:20:06+5:302016-01-07T02:20:06+5:30
वडाळी फाट्यानजीकची घटना

दुचाकीची बैलगाडीला धडक; दोन जण ठार
नांदुरा (जि. बुलडाणा): मोताळ्याकडे भरधाव वेगात जाणार्या दुचाकीची समोरून येणार्या बैलगाडीस जबर धडक लागून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील आई व मुलगा जागीच ठार झाले. हा अपघात ६ जानेवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडाळी फाट्यानजीक घडला. दरम्यान, या अपघातामध्ये बैलाचाही मृत्यू झाला.नांदुरा खुर्द येथील मनोहर किनगे हे त्यांची बैलगाडी घेऊन येत होते. दरम्यान, गोसिंग येथील एकनाथ रंगलाल शिंदे व प्रभाबाई रंगलाल शिंदे हे दुचाकीवर एमएच-२८-एए-१७५४ द्वारे शेंब्याकडे जात होते. दरम्यान, त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वडाळीकडून येणार्या बैलगाडीस दुचाकीची जबर धडक लागली. त्यात दुचाकीचालक एकनाथ शिंदे व त्यांची आई प्रभाबाई शिंदे हे घटनास्थळीच गतप्राण झाले. अपघातादरम्यान बैलगाडीचा एक बैलही गतप्राण झाला. या घटनाक्रमादरम्यान बुलडाण्याकडून नांदुर्याकडे येणारी १0८ क्रमांकाच्या अँम्ब्युलन्सचा चालक आशिष गर्दे यांनी प्रसंगावधान राखून प्रभाबाई शिंदे यांना रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रभाबाई व एकनाथ हे दोघे मायलेक असल्याची माहिती समोर येत आहे. वृत्त लिहिपर्यंंंत याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.