दोन दिवसांत दोन एसटींना आग
By Admin | Updated: October 11, 2014 01:18 IST2014-10-10T23:04:31+5:302014-10-11T01:18:11+5:30
मेहकर येथील प्रकार; कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

दोन दिवसांत दोन एसटींना आग
मेहकर (बुलडाणा) : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात उभ्या असलेल्या आज एसटी बसला अचानक आग लागली. महामंडळातील काही कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी घडली. काल ९ ऑक्टोबरलादेखील एसटी बसला आग लागली होती. लागोपाठच्या आगींमुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.
स्थानिक आगार परिसरात गुरुवारी सायंकाळी ६:३0 वाजताच्या सुमारास उभ्या असलेल्या एमएच ४0 - ८८१७ क्रमांकाच्या एसटी बसने अचानकपणे पेट घेतला होता. बसमधील सीट जळत असल्याचे तेथे असलेल्या एका कर्मचार्याच्या लक्षात आले. सर्व सहकार्यांनी पाणी टाकून आग विझविली. सदर घटनेला एक दिवसही उलटला नाही तोच शुक्रवारी सकाळी ६ वाजता आगाराच्या गेटजवळ उभी असलेली एमएच ४0 - ८४४५ क्रमांकाच्या एसटीच्या सीट व इंजिनला आग लागली. कर्मचार्यांच्या सर्तकतेमुळे दोन्ही घटनांमध्ये होणारा मोठा अनर्थ टळला. वेळीच कर्मचार्यांनी स्वत: पाणी टाकून आग विझविली, अन्यथा दोन्ही बस जळून खाक झाल्या असत्या. आगाराच्या सुरक्षा भिंती कमी उंचीच्या असल्याने भिंतीच्या मागे राहणार्या वस्तीतील लोक सर्रास आगारात प्रवेश करतात. त्यामुळे बसला लागलेली आग हा घातपात असल्याचा संशय कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.