दोन यंत्र पडले बंद
By Admin | Updated: October 16, 2014 00:56 IST2014-10-16T00:35:44+5:302014-10-16T00:56:45+5:30
खामगाव विधानसभा मतदारसंघात सरासरी ७१ टक्के मतदान.

दोन यंत्र पडले बंद
खामगाव (बुलडाणा): खामगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी आज शहरी आणि ग्रामीण भागात सरासरी ७१ टक्के मतदान झाले. मतदारसंघातील दोन गावांमध्ये ईव्हीएम बंद पडल्याची घटना घडली तर मोरगाव डिग्रस येथे दुपारी १२ पर्यंत नागरिकांनी म तदानावर बहिष्कार टाकला होता. या घटना वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान पार पडले.
मतदारसंघातील मतदारांमध्ये सकाळपासूनच प्रचंड उत्साह दिसून आला. मध्यंतरात काही काळ मतदान प्रक्रिया थंडावली होती; मात्र सायंकाळी मोठय़ा संख्येने नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे शहर आणि परिसरात मतदानाची टक्केवारी वाढली. खामगाव म तदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१0 टक्के, १ वाजेपर्यंत ३६.६५ टक्के, ३ वाजेपर्यंत ४९.९२ टक्के तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.१६ टक्के मतदान झाले होते.
मतदारसंघातील वाहळा (ता. खामगाव) आणि वरुड (ता. शेगाव) येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना ऐनवेळी मतदान यंत्राने दगा दिला. दुपारी १ वाजताच्या सुमारास मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती. दुसरे यंत्र बसविल्यानंतर उपरोक्त दोन्ही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. खामगाव मतदार संघातील मोरगाव डिग्रस ता. शेगाव येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकला होता. दरम्यान, प्रशासकीय अधिकार्यांच्या आश्वासनानंतर मतदानावरील बहिष्कार मागे घेतला. या ठिकाणी दुपारी २ वाजता मतदान सुरू झाले.
*नावातील चुकांचा अनेकांना बसला फटका
नवीन मतदारांची नोंदणी करताना निवडणूक विभागाकडून गंभीर चुका झाल्या. नावात बदलासह मतदार यादीतील फोटोही चुकीचे प्रकाशित झाल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. काही महिला मतदारांच्या पतीच्या नावाऐवजी त्यांच्या वडिलांच्या नावाची नोंद करण्याचा पराक्रमही निवडणूक विभागाकडून झाला. यामुळे शहरातील बर्याच मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचे चित्र दिसून आले.
खामगाव मतदारसंघ
एकूण मतदान २,६५,१८२
महिला १,२३,५५६
पुरुष १,४0,६२५
मतदान केंद्र २९१