Two judges of Nagpur bench examine Lonar lake | नागपूर खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनी केली लोणार सरोवराची पाहणी

नागपूर खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनी केली लोणार सरोवराची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/लोणार: जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या क्षती प्रतिबंध व संवर्धनाच्या दृष्टीने नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या संदर्भाने नागपूर खंडपीठाचे न्यायामुर्ती एस. बी. सुक्रे आणि न्यायमुर्ती माधव जामदार यांनी २२ फेब्रुवारी रोजी लोणार सरोवराची प्रत्यक्ष पाहणी केली. सोबतच सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशांची प्रत्यक्ष जमिनस्तरावर प्रशासनाने कितपत अंमलबजावणी केली याचा आढावा घेतला.
दरम्यान, या पाहणीनंतर तहसिल कार्यालयात द्वय न्यायमुर्तींनी महसूल, वन्यजीव, पुरातत्व विभाग व संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन त्यांच्याकडून एकंदरी स्थितीची माहिती घेतली. सोबतच लोणार सरोवर व लगतच्या परिसराच्या संवर्धनामध्ये काही अडचणी येत आहेत का? या बाबतही विचारणा केली. द्वय न्यायमुर्तींनी विरजतिर्थ, नीरी प्रकल्प (नबीचा खडा), इजेक्टा ब्लँकेट आमि सरोवराची पाहणी केली. त्यानंतर सरोवराच्या मध्य भागाच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याचे परिक्षण करण्याबाबत ही आदेशीत केले.
सरोवरातील पिसाळ बाभूळ काढण्यासाठी हस्त यंत्राचा वापर केल्या जावा, जेणेकरून काम त्वरित पूर्ण होईल यावर लक्ष केंद्रीत करण्याबाबत सुचीत केले. मोठ्या यंत्राचा त्यासाठी वापर होणार नाही, असे स्पष्ट करत विरजतिर्थ धार येथे पर्यटकांसाठी स्वच्छता गृहाची त्वरित व्यवस्था करून त्याचे काम पूर्ण केले जावे, असे आदेशच पुरातत्व विभागास दिले. जुन्या विश्राम गृहावर आकाशातील तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था करण्याचे बांधकाम विभागाला व वन्यजीव विभागाला आदेश दिले. इजेक्टा ब्लँकेट जतन केलेल्या ठिकाणाची पाहणी करून न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे येथे छेडछाड न करण्याचे आदेशच द्वय न्यायमुर्तींनी वन्यजीव विभागाला दिले. यानंतर स्मशानभूमीसाठीचा निधी त्वरित मंजूर केला जावा, एमएसआरडीने नवीन बायपास मेहकर रोड, हिरडव रोड, लोणी रोड, पांग्रा रोड, देऊळगाव कुंडपाळ जवळ लोणार-मंठा रोडला जोडणाºया जमिनीचे त्वरित अधिग्रहण करून काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
तहसीलमध्ये झालेल्या बैठकीत संबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्यांनी प्रश्न विचारून सविस्तर माहिती जाणून घेतली.


सकारात्मक सुचनांचे स्वागत
लोणार सरोवर क्षती प्रतिबंध आणि संवर्धनासाठी देशातील तसेच विदेशी नागरिक किंवा पर्यटकांकडून काही सकारात्मक सुचना असल्यास त्याचे खंडपीठास आवर्जून सादर केल्या जाव्यात, अशा सुचनाही न्यायामुर्ती एस. बी. सुक्रे आणि न्यायमुर्ती माधव जामदार यांनी यावेळी दिल्या असल्याचे प्राचार्य सुधाकर बुगदानने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


बैठकीला यांची होती उपस्थिती
सरोवरा संदर्भात झालेल्या बैठकीस न्यायमुर्तींसह जिल्हा न्यायाधिश खोंगल, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, एसडीओ गणेश राठोड, समिती सदस्य प्रा. बळीराम मापारी, प्राचार्या सुधाकर बुगदाणे, प्रा. गजानन खरात, वन्यजीवचे जिल्हा उपवनसंरक्षक मनोजकुमार खैरनार, बांधकाम विभागाचे चंद्रशेखर शिखरे, तहसिलदार सैफन नदाफ, एच. पी. हुकरे, अजय हाटाळे, तलाठी विजय पोफळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Web Title: Two judges of Nagpur bench examine Lonar lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.