लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून लाेणार तालुक्यातील दाेन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ फेब्रुवारी राेजी समाेर आली आहे. केशव विश्वनाथ वाघ (५३) रा. शिवणीपिसा व पुंजाजी बळीराम जाधव (५०) रा. सुलतानपूर अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. शिवणीपिसा येथील शेतकरी केशव विश्वनाथ वाघ यांना गतवर्षापासून शेतीत अपेक्षित उत्पन्न हाेत नव्हते. अशातच यावर्षी अतिवृष्टीने सोयाबीन हातचे गेल्याने लागवड खर्चही वसूल झाला नाही. शासकीय मदतीचा लाभही मिळाला नसल्याने पुढील वर्षभराचे नियोजन कसे करावे, या विवंचनेतच केशव वाघ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा आप्त परिवार आहे. सुलतानपूर येथील शेतकरी पुंजाजी बळीराम जाधव यांनी बोरखेडी रस्त्यावरील शेतात लिंबांच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न झाले नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर संकट काेसळले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दाेन शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:46 IST