दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होणार
By Admin | Updated: May 2, 2017 23:48 IST2017-05-02T23:48:56+5:302017-05-02T23:48:56+5:30
शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करू: तहसीलदार काकडे यांची माहिती

दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होणार
मेहकर : नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा तसेच तुरीचा बारदाना नसल्याने मेहकर येथील तूर खरेदी केंद्र काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसात मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले.
१ मे रोजी नाफेड अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ व महसूल अधिकारी यांची तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष काकडे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करीत होते. शेतकऱ्यांची खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने तसेच बारदाना नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. जवळपास १९ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप करणे अजूनही बाकी आहे, तर खरेदी केलेली तूर ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर ठेवण्यात आली आहे. तूर खरेदी केंद्र लवकर सुरु व्हावे, यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. मेहकर येथील खरेदी केलेली तूर आज व उद्या उचलून खामगाव येथे साठविण्यात यावी, तसेच उर्वरित तूर खरेदी करून त्याचे तत्काळ मोजमाप करावे, अशा सूचना तहसीलदार काकडे यांनी यावेळी दिल्या.
तूर खरेदी ही २४ तास सुरू ठेवणे शक्य नाही, त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंतच तूर खरेदी केंद्र सुरु ठेवावे, नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर गर्दी होऊन गोंधळ होत आहे. यामुळे वाद-विवादसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे यापुढे तुरीचे मोजमाप हे पोलीस बंदोबस्तात करण्यात यावे, अशा सूचनाही तहसीलदार संतोष काकडे यांनी दिल्या आहेत. नाफेडचे तूर खेरदी केंद्रांवर खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने उघड्यावर अथवा मार्केट यार्डात तूर ठेवावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने खरेदी केलेली तूर लवकर न उचलल्यास तुरीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सातबाराची खात्री करुनच मोजमाप करावे
नाफेडच्या केंद्रावर काही व्यापारी शेतकऱ्यांची तूर बाहेर कमी भावात खरेदी करुन तीच तूर नाफेड केंद्रावर जादा भावाने विकत असल्याच्या तक्रारी येत असल्याने ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांचा सात-बारा असल्याची खात्री करुन प्रत्यक्ष शेतकरी हजर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तूर माल, सात-बारा, उत्पादन क्षमता पडताळून घेऊनच तुरीचे मोजमाप करावे, अशा सूचना तहसीलदार संतोष काकडे यांनी दिल्या.