बुलढाण्यात विषारी औषधाने दोन कोटी मधमाशांचा बळी, शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान
By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 3, 2023 17:49 IST2023-07-03T17:48:14+5:302023-07-03T17:49:58+5:30
देऊळगाव माळी येथील शेतकरी पांडुरंग रामदास मगर (वय २५) यांनी आपल्या शेतामध्ये गत तीन वर्षापासून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे.

बुलढाण्यात विषारी औषधाने दोन कोटी मधमाशांचा बळी, शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान
मेहकर - तालुक्यातील देऊळगाव माळी येथे विषारी औषधाने दोन कोटींवर मधमाशांचा बळी घेतल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. यामध्ये शेतकऱ्याचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीने १२५ पेट्यांमध्ये विषारी औषध टाकल्याने मधमाशांचा मृत्यू झाला.
तालुक्यातील देऊळगाव माळी येथील शेतकरी पांडुरंग रामदास मगर (वय २५) यांनी आपल्या शेतामध्ये गत तीन वर्षापासून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये १२५ पेट्या आणून मधुमक्षिका पालन सुरू आहे. एका पेटीमध्ये साधारणता २० हजारापेक्षा जास्त मधमाशा असतात. अज्ञात व्यक्तीने विषारी औषधाची पावडरच्या १५ ते २० पुड्या आणून १२५ पेट्यांमध्ये ते विषारी औषध टाकले. त्यामुळे त्या प्रत्येक पेटीत असलेल्या दोन कोटींपेक्षा जास्त मधमाशांचा मृत्यू झाला आहे.
अज्ञात व्यक्तीच्या या प्रकारामुळे शेतकरी पांडुरंग रामदास मगर यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन टनापेक्षा जास्त मध जमा झालेला होता. या प्रकरणाची मेहकर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तरुण शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत देऊन मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांमधून होत आहे.