निमखेडीत विजेचा धक्का लागून दोन भाऊ जखमी
By Admin | Updated: January 8, 2017 02:14 IST2017-01-08T02:13:40+5:302017-01-08T02:14:26+5:30
तारेवर सुकण्यासाठी ठेवलेले कपडे काढत असताना वीजेच्या धक्क्याने दोन भाऊ गंभीर जखमी.

निमखेडीत विजेचा धक्का लागून दोन भाऊ जखमी
कोथळी(बुलडाणा), दि. ७- निमखेडी गावात तारेवर सुकण्यासाठी ठेवलेले कपडे काढत असताना विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून दोन भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.
निमखेडी येथील मोहन नारायण चव्हाण व ङ्म्रावण नारायण चव्हाण हे दोघे भाऊ कुटुंबासमवेत एकमेकांच्या शेजारी राहतात. शनिवार सकाळी श्रावण चव्हाण याने आंघोळ झाल्यानंतर तारेवरील कपडे काढण्यासाठी हात लावला असता, त्याला जोरदार विजेचा धक्का बसून तो खाली पडला. हा प्रकार पाहून घरामध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी त्याची पत्नी, मुले-मुलींनी त्याला वाचविण्यासाठी धावपळ केली. गावकर्यांचे प्रसंगावधान व रोहित्रावरील फ्यूज त्याक्षणी उडाल्यामुळे ते सर्व जण वाचले. त्याला तत्काळ कोथळी येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.
दरम्यान, रस्ता कामासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने रोहित्रावरील फ्यूज टाकण्यात आले. त्याचवेळी ङ्म्रावण चव्हाणच्या घराला लागून असलेले त्याचे मोठे भाऊ मोहन चव्हाण यांनीसुद्धा आंघोळ झाल्यावर तारेवरील कपड्याला हात लावला असता, त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यावेळी गावचे पोलीस पाटील प्रेमदास राठोड हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी तत्काळ काठीने तार तोडून विद्युत प्रवाह खंडित केला.
प्रवाहित विद्युत तार टिनपत्र्याला लागून कट झाल्यामुळे दोघा भावांच्या घरात विद्युत प्रवाह प्रवाहित झाला होता. गावकर्यांच्या प्रसंगावधानामुळे दोघे भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचले. संध्याकाळपर्यंत दोघा भावांची प्रकृती स्थीर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.