मोदींच्या भाषणाला टिव्हीचा अडथळा
By Admin | Updated: August 31, 2014 00:43 IST2014-08-31T00:41:25+5:302014-08-31T00:43:25+5:30
शिक्षक दिनाचा संवादासाठी बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के शाळांमध्ये दूरचित्रवाणीची व्यवस्थाच नाही.

मोदींच्या भाषणाला टिव्हीचा अडथळा
बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनाचे औचित्य साधत देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. दूरचित्रवाणी, रेडीओ किंवा इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंतप्रधान संदेश देणार असले तरी हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंंत पोहचविण्यामध्ये साधनांचा अभाव ही प्रमुख अडचण ठरणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के शाळांमध्ये दूरचित्रवाणीची व्यवस्था नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे गावातून टी.व्ही. ची उसनवारी शिक्षण विभागाला करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद, नगरपालीका व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. राज्याच्या शिक्षण सचिवांनी सर्व शिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात तातडीने सूचना दिली असून आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये काय सुविधा आहेत याची माहिती मागितली आहे. या संदर्भात आज शिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता शाळांमधील साधन व्यवस्थेचा कुठलाही डाटा या कार्यालयाकडे उपलब्ध नव्हता. मात्र वरिष्ठांकडून आलेल्या आदेशावरून आता जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कामाला लागल्याचे दिसून आले.
*इंटरनेट कनेक्टीव्हीटी
संगणक असलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांपैकी केवळ २३ शाळांमध्येचे इंटरनेट कनेक्टीव्हीटी असल्याची माहिती आहे. सर्व शिक्षा अभियानातून संगणक मिळालेल्या १९५ शाळांपैकी केवळ ७४ शाळांमध्येच इंटरनेट कनेक्टीव्हीटी आहे मात्र ब्रॉड बॅन्डची सेवा विस्कळीत असल्याने हे संगणक सुद्धा शोभेचे ठरले आहेत.
*१00 शाळेत टीव्ही
जिल्हा परिषदेच्या १00 शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच बसविण्यात आहे तर खाजगी शाळांमध्ये जवळपास सर्वच शाळांमध्ये ही व्यवस्था संस्थांनी केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील किमान ६00 शाळांमधील विद्यार्थ्यांंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ५ सप्टेबर रोजी प्रसारीत होणारे भाषण टीव्हीवर पाहता येणार आहे.
*दूर्गम भागात रेडीओ
संग्रामपूर, जळगाव जामोद सारख्या दूर्गम भागातील शाळांमध्ये रेडीओ हाच एकमेव पर्याय प्रशासना समोर आहे. भिंगारा, चाळीसटपरी, गोमाळ अशा अतिदुर्गम भागात तर आजतागायत वीज पुरवठाही पोहचलेला नाही त्यामुळे येथील शाळांमध्ये रेडीओ वरूनच पंतप्रधानांचे भाषण ऐकवावे लागणार आहे.