उपचार महागले, सुविधांची वानवा
By Admin | Updated: December 30, 2015 01:48 IST2015-12-30T01:48:53+5:302015-12-30T01:48:53+5:30
बुलडाणा जिल्हा रुग्णालयाचे चित्र; अनेक सुविधा नावापुरत्याच!

उपचार महागले, सुविधांची वानवा
बुलडाणा: शासकीय रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा कणा समजला जातो; मात्र आरोग्य उपचारासाठी नि:शुल्क व कमी दरात पुरविण्यात येणार्या विविध सुविधांच्या शुल्कांमध्ये जवळपास दुप्पट वाढ करण्याचा आदेश सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे. यामुळे सामान्य रुग्णांवर आर्थिक बोझा पडणार आहे. या वाढीव शुल्काच्या पृष्ठभूमीवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयात सुविधांची पाहणी केली असता सुविधांची वानवा असल्याची बाब मंगळवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक वैद्यकीय सुविधेचा आढावा घेतला असता, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णायांची संख्या २0, कॅन्सर, टीबी रुग्णालय १, इतर शासकीय रुग्णालय ७५ आहे; मात्र या आरोग्य व्यवस्थेत असलेल्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहली आहे. आरोग्य प्रशासनातील अद्यापही बरीच पदे रिक्त आहे. शिवाय दररोज उपचार घेणार्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही उपचार देण्यासाठी रुग्णालय उपलब्ध सुविधा कुचकामी ठरत आहे. जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात क्ष-किरण, सिटी स्कॅन, मनोरुग्ण तपासणी, शरीर वैद्यकीय तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, ईसीजी, नेत्र तपासणी, पुरुष व स्त्री पट्टीबंधन, अस्थिरोग तपासणी, प्लास्टर, लसीकरण, एचआयव्ही चाचणी, त्वचा व गुप्तरोग, दंत्तरोग, स्त्रीरोग तपासणी, बालरोग चिकित्सा, आयसीयू, संसर्गरोग तपासणी, डायलेशीस, जळितांवर उपचार, प्रसूती आदी आरोग्य सेवा-सुविधा आहे; मात्र सर्वांंचे तीन-तेरा झाले असून, शुल्क वाढीच्या निर्णयानंतरही सामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यात येईलच, याची शाश्वती नाही.