राजूर घाटात आज यात्रा!
By Admin | Updated: March 7, 2016 02:26 IST2016-03-07T02:26:31+5:302016-03-07T02:26:31+5:30
महाशिवरात्री निमित्त रामेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी.

राजूर घाटात आज यात्रा!
मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील राजूर येथील भक्तांची मनोकामना पूर्ण करणार्या श्री रामेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त दोन दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेला हजारो भाविकांची गर्दी होत असते. सन १९५0 ते ५५ या काळात या मंदीराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे स्थान अतिप्राचीन असून, या मंदिराच्या वास्तूची जडणघडण तेराव्या शतकातील आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून, त्याचे काळ्या पाषाणातील अवशेष आजही तिथे पाहावयास मिळतात. या मंदिराचा जीर्णोद्धार दिवंगत स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज (रा.खंडवा), दिवंगत विनायकराव केशवराव सूर्यवंशी (बुलडाणा), दिवंगत नारायण गंगाराम उदयकार (राजूर), दिवंगत धनजी शिवनाथ शर्मा (बुलडाणा) यांच्या हस्ते करण्यात आला. सन १९६२ मध्ये या मंदिराच्या न्यासाची नोंदणी करण्यात आली. जीर्णोद्धारानंतर होमहवन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाला संत गाडगे महाराज उपस्थित होते. बुलडाणा येथील भाविकांना या मंदिरावर दर्शनाकरीता येताना अजिंठा घाटातून यावे लागत असल्याने त्यांना दर्शनासोबत पर्यटनाचा आनंदसुद्धा उपभोगता येतो. श्री रामेश्वर महादेव मंदिर हे स्थान राजूर येथील नळगंगा या नदीच्या संगमावर वसले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ७ मार्च रोजी महाशिवरात्री यात्रा येथे होत आहे. त्यानिमित्त पहाटेपासून अभिषेक व दर्शनास सुरुवात होईल. सकाळ ते सायंकाळपर्यंत अखंड दर्शनबारी सुरू राहणार आहे. हे स्थान जागृत असून, भक्तांच्या मनोकामना, इच्छा या महादेवाच्या मंदीरात पूर्ण होतात, असे येथे दर्शनास येणार्या भक्तांचे कथन आहे. दुपारी १२ वाजता मंदिर संस्थानतर्फे आरती व घंटानाद होईल. दिवसभर मंदिरात भजनांचा कार्यक्रम सर्वांंचा आनंद द्विगुणीत करणार आहे. मंदिराच्या दक्षिण भागातल्या शेतात यात्रा भरत असते. शासनाने राजूर येथील या रामेश्वर मंदिरास पर्यटनस्थळाचा दर्जा दिला असून, त्या अनुषंगाने विविध सुविधांची कामे पूर्ण केली आहेत. येथील दर्शनाने भक्तांची मनोकामना पूर्ण होत असल्याच्या अख्यायीकेने येथील भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.