ट्रेलर-दुचाकी अपघातात वडील ठार, मुलगी गंभीर
By Admin | Updated: April 17, 2017 00:45 IST2017-04-17T00:45:04+5:302017-04-17T00:45:04+5:30
नांदुरा : मालवाहू ट्रेलर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नांदुरानजिक घडली.

ट्रेलर-दुचाकी अपघातात वडील ठार, मुलगी गंभीर
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
नांदुरा : मालवाहू ट्रेलर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नांदुरानजिक घडली.
प्रकाश नारायण अंभोरे (वय ५५) रा.दुर्गानगर नांदुरा हे मुलगी पल्लवी सोबत मोटारसायकल क्र.एमएच २८ एडी ८९६५ ने दुर्गानगर येथे घरी येत असताना जळगाव खांदेशकडे जाणाऱ्या ट्रेलर क्र. एमएच ४६ बीबी ०५९५ ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की प्रकाश अंभोरे यांचे शरीर अक्षरश: छिन्नविच्छिन्न झाले, तर मागे बसलेल्या मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर व बढे नामक इसमाने घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी हलविण्यात आले. तर प्रकाश अंभोरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णवाहिकेद्वारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणला.
या अपघातात जखमी झालेल्या पल्लवी अंभोरे हिचेवर खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पल्लवीचे पायावर शस्त्रक्रिया झाली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या अपघातप्रकरणी अजय सीताराम धनोकार राहणार नांदुरा यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त क्रमांकाच्या ट्रेलर चालकाविरुद्ध अपराध नं.१३९/१७ कलम २७९, ३०४ अ, ३३७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती राठोड करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर झालेले अतिक्रमण तसेच वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या व वळण रस्त्याचा शासन दरबारी प्रलंबित असलेला प्रश्न यामुळे या मार्गावर अपघाताची मालिका सुरुच असून, नागरिक मृत्युमुखी पडत आहे. तरी या गंभीर बाबीकडे राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदरचा प्रश्न निकाली काढावा, अशी सुज्ञ नागरिकांमधून मागणी होत आहे.