रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला!
By Admin | Updated: November 23, 2015 01:19 IST2015-11-23T01:19:58+5:302015-11-23T01:19:58+5:30
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात लाख नऊ हजारांचा माल जप्त.

रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला!
इसोली (जि. बुलडाणा): बुलडाणा-डोंगरशेवली रस्त्यावरील डोंगरशेवली फाट्याजवळ शनिवारी उत्तररात्री २ वाजता रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख हे शनिवारी रात्री बुलडाण्याकडून डोंगरशेवली मार्गे अमडापूर पोलीस ठाण्याकडे आपल्या ताफ्यासह येत असताना विरुद्ध दिशेने येणारा टिप्पर (एमएच २१ एक्स ५४५४) ला हात दाखविला व वाहनाची चालकाकडे चौकशी केली. सदर टिप्पर मध्ये विनापरवाना रेती भरलेली आढळून आले. समीर शेख यांनी टिप्पर व चालकासह सोबत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले. सदर प्रकरणामध्ये समीर शेख यांनी स्वत: फिर्यादी होऊन टिप्परबाबत तक्रार दिली. सदर तक्रारीवरून सात लाख नऊ हजार रुपये किमतीचा टिप्पर व त्यामध्ये असलेली नऊ हजार रुपयांची तीन ब्रास रेती जप्त केली तसेच आरोपी सुनील बाजीराव लोखंडे (२७ रा. चिखली), ज्ञानेश्वर शालीकराम इंगळे, सुरेश वामन बावस्कर या तीन जणांना अटक केली. या प्रकरणातील एक आरोपी विनोद काळे (रा. जाफ्राबाद) याला अटक करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चारही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपींना २२ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.