रेतीची तस्करी; तीन टिप्पर जप्त
By Admin | Updated: May 25, 2016 01:35 IST2016-05-25T01:35:40+5:302016-05-25T01:35:40+5:30
धाड येथे तहसीलदाराच्या पथकाची कारवाई; १ लाख २६ हजारांचा दंड केला वसूल.

रेतीची तस्करी; तीन टिप्पर जप्त
धाड (जि. बुलडाणा) : महसूल विभागाच्यावतीने बुलडाणा तालुक्यात रेती तस्करी विरोधात मोहीम राबवण्यात आली असून, मंगळवारी दिवसभरात तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार अजीत शेलार यांनी धाड भागातून दोन रेतीचे टिप्पर तर एक टिप्पर बुलडाणा येथे अवैध रेतीची वाहतूक करताना पकडले.
या दोन टिप्परमध्ये प्रत्येकी तीन ब्रास तर एका टिप्परमध्ये दोन ब्रास रेती होती. टिप्पर हे विजय सीताराम भोंडे, सुनील भगवान उगले व विष्णू गाळेकर यांचे असून, या तीन टिप्परवर कारवाई करण्यात आली. यापैकी दोन टिप्पर धाड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले, तर एक बुलडाणा तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला. या वाहनांतील रेतीवर प्रत्येकी १५७00 रु. ब्रास प्रमाणे एकूण १ लाख २६ हजाराचा दंड आकारण्यात आला.
वरील कारवाईत तलाठी किशोर कानडजे एन.पी.देठे, शिवाजी ताठे यांनी सहभाग घेतला होता. गेल्या दोन दिवसात महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत २ लाख ५0 हजारांचा दंड आकारला असून, या मोहिमेने रेती तस्करांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, ही मोहीम आणखी काही दिवस महसूल विभागाने सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.