निकृष्ट टायर बदलून देण्यास ट्रॅक्टर कंपनीची टाळाटाळ
By Admin | Updated: May 24, 2017 00:18 IST2017-05-24T00:18:13+5:302017-05-24T00:18:13+5:30
मेहकर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्जावर ट्रॅक्टर घेतलेले आहेत; परंतु सदर ट्रॅक्टरचे अवघ्या काही दिवसांत टायर खराब झाल्याने अनेक ट्रॅक्टर बंद अवस्थेत पडले आहेत.

निकृष्ट टायर बदलून देण्यास ट्रॅक्टर कंपनीची टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध फायनान्स कंपनीकडून कर्जावर ट्रॅक्टर घेतलेले आहेत; परंतु सदर ट्रॅक्टरचे अवघ्या काही दिवसांत टायर खराब झाल्याने अनेक ट्रॅक्टर बंद अवस्थेत पडले आहेत. दरम्यान, तालुक्यातील भालेगाव येथील गोविंद संतोषराव धोंडगे या शेतकऱ्याने घेतलेल्या नव्या ट्रॅक्टरचे टायर खराब झाल्यामुळे सदर ट्रॅक्टर गेल्या एक महिन्यापासून शोरूमला ठेवण्यात आले आहे. टायर बदलून देण्यासाठी संबंधित कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार सदर शेतकऱ्याने केली असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे.
भालेगाव ता. मेहकर येथील गोविंद संतोषराव धोंडगे या शेतकऱ्याने इन्डस बँक बुलडाणा यांच्याकडून पाच लाख रुपये कर्ज घेऊन बालाजी ट्रॅक्टर्स देऊळगावराजा यांच्याकडून मेसी फॉर्ग्युशन ५० हॉर्स पॉवर या कंपनीचे ट्रॅक्टर घेतले आहे. दरवर्षी पावसाळा कमी होऊन जमिनीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्याने दुसरा व्यवसाय करावा, या उद्देशाने तालुक्यातील भालेगाव येथील गोविंद धोंडगे यांनी बँकेचे कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतले. ट्रॅक्टर घेतल्यानंतर काही दिवस सदर ट्रॅक्टर सुरळीत सुरू होते. त्यामुळे धोंडगे यांचा व्यवसायसुद्धा चांगला सुरू होता; परंतु ट्रॅक्टर घेतल्यानंतर काही दिवसांतच या नवीन ट्रॅक्टरचे दोन्ही टायर खराब झाली आहेत. त्यामुळे गोविंद धोंडगे यांचा व्यवसाय गेल्या महिन्यापासून बंद आहे. खराब झालेले ट्रॅक्टरचे टायर तत्काळ बदलून देण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे; परंतु गेल्या एक महिन्यापासून गोविंद धोंडगे हे दररोज बालाजी ट्रॅक्टर यांच्याकडे चकरा मारत आहेत; परंतु संबंधित कंपनीचे अधिकारी टायर देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
त्यामुळे धोंडगे यांचा व्यवसाय बंद पडला असून, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. बँकेकडून कर्ज घेतल्यामुळे बँकेवाले कर्जाचा हप्ता भरण्यासाठी धोंडगे यांच्या घरी चकरा मारत आहेत; परंतु टायरअभावी ट्रॅक्टर एक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने सदर बँकेचा हप्ता फेडण्यास धोंडगे यांना अडचणी येत आहेत, तर कंपनीवालेसुद्धा टायर देण्यास टाळाटाळ करीत असल्याने धोंडगे हे अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्याने बँकेकडे दिला अर्ज
गोविंद धोंडगे रा. भालेगाव यांनी इन्डस बँक बुलडाणा यांच्याकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये कर्ज घेतलेले आहे. त्यामुळे बँकवाले कर्जाचा हप्ता भरण्यासाठी धोंडगे यांच्याकडे तगादा लावत आहेत. ट्रॅक्टर हे टायरअभावी बंद अवस्थेत असल्याने धोंडगे आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे जोपर्यंत कंपनी टायर देणार नाही व ट्रॅक्टरद्वारे सुरळीत काम सुरू होणार नाही, तोपर्यंत कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी सवलत द्यावी व कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी गोविंद धोंडगे यांनी बँक व्यवस्थापकाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या टायरसंबंधी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. ट्रॅक्टरच्या दोन टायरची मंजुरात मिळाली असून, ४-५ दिवसांत संबंधित शेतकऱ्याला टायर देण्यात येतील.
- अमोल जाधव, ट्रॅक्टर डीलर, देऊळगावराजा