ट्रॅक्टर चोरट्यांचे रॅकेट सक्रिय
By Admin | Updated: February 5, 2015 01:16 IST2015-02-05T01:16:36+5:302015-02-05T01:16:36+5:30
तीन चोरट्यांना अटक ; तीन ट्रॅक्टर जप्त.

ट्रॅक्टर चोरट्यांचे रॅकेट सक्रिय
बुलडाणा : मागील काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये सतत ट्रॅक्टर चोरीचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात होणार्या ट्रॅक्टर चोरीप्रकरणी बुलडाणा पोलिसांनी औरंगाबाद येथून तीन चोरट्यांना ४ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली आहे. या आरोपींनी जिल्ह्यातून सहा ट्रॅक्टरची चोरी केल्याची कबुली दिली असून, यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.
मेहकर तालुक्यातील हिवराआश्रम येथील दत्तात्रय अशोक म्हस्के यांच्या मालकीचे ट्रॅक्टर चोरी गेल्याची तक्रार साखरखेर्डा पोलिसात २२ जानेवारी रोजी करण्यात आली होती. ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्रीमती र्श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बुलडाणा पोलीस स्टेशनस्तरावर पथके तयार करण्यात आली.
या पथकांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सूर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनात ४ फेब्रुवारी रोजी रात्री औरंगाबाद येथून ज्ञानेश्वर रामराव नागरे (२३) रा.वेलतुरा जि.हिंगोली, बाबासाहेब पांडुरंग चव्हाण आणि रवींद्र देवराव पांदे दोघेही रा. चिखलठाणा ता.कन्नड जि.औरंगाबाद या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, हिवराआश्रम येथील ट्रॅक्टर आणि जिल्ह्यातून आणखी सहा ट्रॅक्टर चोरीची कबुली त्यांनी दिली.
पोलीस पथकाने तिन्ही चोरट्यांकडून १८ लाख रुपये किमतीचे ३ ट्रॅक्टर ताब्यात घेतले, तर इतर ४ ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. ट्रॅक्टर चोरट्यांची टोळी सक्रिय असून, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील अनेक ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या कारवाईत स.पो.नि. गोरखनाथ जाधव, नीलेश लोधी, सपोउपनि प्रकाश राठोड, केशव अक्तुरकर, राजू ठाकूर, केशव नागरे, सोनाजी दाभाडे, विजय दराडे, दीपक पवार, विलास साखरे, पोकाँ योगेश सरोदे, अमोल तरमळे, मोहम्मद जाकीर, सुभाष साळोख आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.