५० हजारांच्या लाच प्रकरणी सिंदखेड राजात अव्वल कारकुनास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:32+5:302021-03-04T05:05:32+5:30

अलीकडील काळातील बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई आहे. यासंदर्भात बुलडाणा येथील प्रचार व प्रसिद्धी कंत्राटदार असलेल्या एकाने ...

Top clerk arrested in Sindkhed | ५० हजारांच्या लाच प्रकरणी सिंदखेड राजात अव्वल कारकुनास अटक

५० हजारांच्या लाच प्रकरणी सिंदखेड राजात अव्वल कारकुनास अटक

अलीकडील काळातील बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई आहे. यासंदर्भात बुलडाणा येथील प्रचार व प्रसिद्धी कंत्राटदार असलेल्या एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचे शासकीय कामकाजाचे थकीत असलेले देयक वरिष्ठांना सादर करून काढून देण्यासाठी सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ४२ वर्षीय अव्वल कारकून (वर्ग ३) दीपक शंकरराव गोरे याने कंत्राटदारास एक लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी दीपक शंकर गोरे हा सध्या सिंदखेड राजा येथेच राहत होता. तो मूळचा वाशिम शहरातील गणेशपेठमधील रहिवासी आहे. दरम्यान, २ मार्च रोजी पडताळणीत लाच मागितल्याचे समोर आले होते. त्या अनुषंगाने ३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला होता. त्या वेळी तक्रारदाराकडून लाचेचा ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी दीपक शंकरराव गोरे यास रंगेहाथ पकडले. सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लाच स्वीकारताना ही कारवाई एसीबीच्या पथकाने केली. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलीस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, विजय मेहेत्रे, विनोद लोखंडे, चालक मधुकर रगड, अर्शीद शेख यांनी सहभाग घेतला होता. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड (अमरावती परिक्षेत्र) आणि अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी हे करीत आहेत. दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांनी केले आहे.

Web Title: Top clerk arrested in Sindkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.