कुलर सुरू असताना वीजेचा धक्का बसल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By अनिल गवई | Updated: July 4, 2023 16:30 IST2023-07-04T16:29:54+5:302023-07-04T16:30:05+5:30
गोपाळ नगरातील घटना, डाबेराव कुटुंबियांवर शोककळा

कुलर सुरू असताना वीजेचा धक्का बसल्याने चिमुकल्याचा मृत्यू
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): कुलर सुरू असताना वीजेचा धक्का लागल्याने एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना खामगाव शहरातील गोपाळ नगर परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. चिमुकल्याला गंभीर अवस्थेत तात्काळ एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, स्थानिक गोपाळ नगरातील अभिमन्यू डाबेराव यांचा मेसचा व्यवसाय असून, त्यांना एक मुलगा आणि मुलगी असे दोन अपत्य आहेत. यापैकी ५ वर्षीय सूरज नामक चिमुकला अंगणात लावलेल्या कुलरजवळ खेळत होता. खेळता खेळता त्याला कुलरचा स्पर्श झाला. अशातच वीजेचा धक्का बसल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. गंभीर अवस्थेत नातेवाईक आणि शेजार्यांनी त्याला खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. चिमुकल्याचा अकाली मृत्यू झाल्याने, गोपाळ नगरातील डाबेराव कुटुंबियांवर एकच शोककळा पसरली आहे.