संतनगरीत आज श्रींचा पुण्यतिथी महोत्सव
By Admin | Updated: August 29, 2014 23:50 IST2014-08-29T23:43:17+5:302014-08-29T23:50:53+5:30
उत्सवानिमित्त ६५0 भजनी दिंड्यांचे शेगावात आगमन.

संतनगरीत आज श्रींचा पुण्यतिथी महोत्सव
गजानन कलोरे /शेगाव
संतनगरी शेगावात श्री गजानन महाराजांचा १0४ वा पुण्यतिथी महोत्सव भाद्रपद शु.५ शनिवारी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ७ ते ९ हभप कव्हळेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. उत्सवात सुरू करण्यात आलेल्या यज्ञाची पूर्णाहुती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. दुपारी २ वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा गज अश्वासह नगर परिक्रमा निघणार आहे. रविवार ३१ ला सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहांडी, गोपाळकाला या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने संतनगरीत सर्वत्र हरिनामाच्या गजराचे गंजण होत आहे. उत्सवाकरिता लगतच्या परिसर व जिल्हय़ातून ६५0 चेवर भजनी दिंड्यांचे आगमन होऊन श्री चरणी श्रद्धा अर्पित करून महाप्रसाद घेऊन आपआपल्या गावी परतत आहेत. आतापावेतो ४ ते ५ भजनी दिंड्या मुक्कामी थांबलेल्या आहेत.
त्या दिंड्यांना संस्थानकडून मंडपाकरिता सहयोग राशीसुद्धा देण्यात येत आहे. तसेच संस्थानकडून मुक्कामी भजनी दिंड्यांना जागा, लाईट, पाणी आदीचे सहकार्यसुद्धा देण्यात येत आहे.
आलेल्या भजनी दिंड्यांना महाप्रसाद, संस्थानच्या नियमांची पूर्तता केलेल्या दिंड्यांना भजनी साहित्य, माउली पताका, अंशदान भजनी साहित्य दुरुस्तीकरिता व दवाखाना अशी सुविधा देण्यात येत आहे. संत गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.