आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा
By Admin | Updated: April 15, 2017 00:39 IST2017-04-15T00:39:45+5:302017-04-15T00:39:45+5:30
सिंदखेडराजा/मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे.

आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा
सिंदखेडराजा येथून प्रारंभ; शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक अधिक आक्रमक
सिंदखेडराजा/मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून प्रारंभ होऊन ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून, १८ एप्रिल रोजी शहापूर येथे दुसऱ्या टप्प्याचा समारोप होईल.
भाजप-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी आयोजित ही यात्रा राष्ट्रमाता मॉ जिजाऊ जन्मभूमीच्या पवित्र शहरामधुन सकाळी १० वाजता प्रारंभ होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा निघत आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राकाँ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंढे, माजी मंत्री पतंगराव कदम, पिरिपाचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, मनोहर नाईक, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे, भाष्कर जाधव, शेकापचे जयंत पाटील, सपाचे प्रदेश अध्यक्ष अबु आझमी, माजी मंत्री अब्दुल सत्तार, वामनराव चटप, आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम नियोजनाची पाहणी राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. या सभेच्या तयारीसाठी शिवाजी राजे जाधव, मधुकर गव्हाड, राजुआप्पा बोंद्रे, जगन सहाने, जगन ठाकरे, अॅड. संदीप मेहेत्रे, भगवानराव सातपुते, डॉ. बुरकुल, राम राठोड, महेश पवार, विजय जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राकाँचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी केले आहे.