त्रासाला कंटाळून जाळून घेतले
By Admin | Updated: February 14, 2015 01:44 IST2015-02-14T01:44:53+5:302015-02-14T01:44:53+5:30
खामगाव तालुक्यातील घटना.

त्रासाला कंटाळून जाळून घेतले
खामगाव (जि. बुलडाणा) : दारुड्या पतीकडून नेहमीच होत असलेल्या मारहाणीला कंटाळून ३७ वर्षीय विवाहितेने जाळून घेतल्याची घटना स्थानिक चांदमारी भागात काल रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवाहितेच्या बयानावरून शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक चांदमारी भागातील घरकुलमध्ये राहणार्या रेखा विनोद खरात (३७) रा. चांदमारी घरकुल या विवाहितेस तिचा पती विनोद खरात हा नेहमीच दारू पिऊन मारहाण करीत असे. या नेहमीच्या मारहाण व त्रासाला कंटाळून तिने काल रात्री अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेतले. तिने पेट घेतल्यानंतर आरडा-ओरडा केल्याने शेजारच्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला व उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. या घटनेत रेखा ही १00 टक्के जळाल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आले आहे. तर रेखा खरात हिचा येथील कार्यकारी दंडाधिकारी यांनी बयान घेतले असता त्यामध्ये तिने पती विनोद याच्या त्रासाला कंटाळून जाळून घेतल्याचे सांगितले. यावरून शहर पोलिसांनी रेखा खरात यांच्यातर्फे पो.काँ. तुकाराम मोरे यांच्या फिर्यादीवरून विनोद खरात विरुद्ध अप.क्र.२७/१५ कलम ४९८ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फटिंग करीत आहेत.