ढगाळ वातावरणामुळे तूर धोक्यात
By Admin | Updated: October 29, 2014 00:12 IST2014-10-29T00:12:10+5:302014-10-29T00:12:10+5:30
बुलडाणा तालुक्यातील पिकपरिस्थिती; सोयाबीन, कपाशी पाठोपाठ तुरीचे उत्पन्न घटण्याची शक्यता.

ढगाळ वातावरणामुळे तूर धोक्यात
बुलडाणा : सोयाबीन, कपाशी हातची गेल्यानंतर शेतकर्यांना तुरीच्या पिकाकडून आशा होती; मात्र गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने तूरही संकटात आली आहे. अळ्यांचा प्रकोप आणि फुलोर गळत असल्याने तुरीचे उत्पन्नही घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काही भागात कमी, तर काही भागात जास्त पाऊस झाला. सुरुवातीपासून पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा करावी लागली. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या होत्या. अशा स्थितीत शेतकर्यांनी सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली. आंतरपीक म्हणून प्रत्येक शेतकर्याने सोयाबीन आणि कपाशीच्या पिकात तुरीची पेरणी केली; मात्र अपुर्या पावसाने आणि किडींच्या प्रकोपाने सोयाबीन उद्ध्वस्त झाले. त्या पाठोपाठ कपाशीनेही दगा दिला. अशा स्थितीत शेतात उभी असलेल्या हिरव्यागार तुरीकडून अपेक्षा होती. सध्या तूर फुलोर्यावर आली आहे; मात्र त्यावर आता ढगाळी वातावरणाचा परिणाम होत आहे. हिरव्या अळ्यांनी तुरीवर आक्रमण केले आहे. पाने कुरतडणार्या या अळीने शेतकर्यांना हैराण केले आहे. तुरीच्या झाडावर पिवळी फुले लागली आहे; परंतु ढगाळ वातावरणाने फुले गळून पडत आहे. त्यामुळे तुरीचे पीकही हाती येण्याची शक्यता कमी आहे. निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसत असताना वन्यजीवांचाही त्रास शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.