‘टिपेश्वर’च्या वाघाने पाच महिन्यात गाठले ज्ञानगंगा अभयारण्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 09:19 PM2019-12-01T21:19:27+5:302019-12-01T21:20:53+5:30

 तीन वर्षाच्या टीडब्ल्यूएलएस टीवनसीवन वाघाने १५० दिवसात कापले १३०० कि.मी.चे अंतर

'Tipeshwar' tiger reaches Gyananga Ganga sanctuary in five months | ‘टिपेश्वर’च्या वाघाने पाच महिन्यात गाठले ज्ञानगंगा अभयारण्य

‘टिपेश्वर’च्या वाघाने पाच महिन्यात गाठले ज्ञानगंगा अभयारण्य

Next

- नीलेश जोशी 

बुलडाणा: तब्बल १५० दिवसांचा दोन राज्यातून आणि सहा जिल्ह्यातून प्रवास करत यवतमाळ जिल्ह्यातील ‘टिपेश्वर’ अभयारण्यातून तीन वर्षाच्या टीवन सीवन वाघाने आता थेट बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य गाठले आहे. या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल १३०० किमीचे अंतर या वाघाने कापले आहे.  त्यामुळे यवतमाळ, नांदेड, तेलंगणा, बुडाणा मार्गे मेळघाट असा एक नवा टायगर कॉरिडॉर होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

दरम्यान, बुलडाणा शहरा लगत १४ किमी अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात या वाघाच्या वास्तव्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असून आगामी काही दिवस हे संपूर्ण अभयारण्य तो पिंजून काढत त्याच्या वास्तव्याच्या दृष्टीने हे ठिकाण योग्य असल्यास येथेच तो स्थिर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेल टायगर असल्याने तो प्रसंगी भटकंती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पापासून तो सध्या अवघा ५० किलोमीटर दुर आहे. अस्वलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्य हे जैवविविधतेसह वाघाच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजिवाची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रसंगी तो येथे स्थिरावण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात टीडब्ल्यूएलएस-१ या वाघीणीने २०१६ च्या शेवटी सीवन वाघासह सी-२ आणि सी-३ अशा तीन पिल्लांना जन्म दिला होता. यातील सी-३ हा वाघ थेट तेलंगणापर्यंत गेला आणि पुन्हा टिपेश्वरमध्ये येवून स्थिरावला आहे. दरम्यान, सी-२ वाघ सध्या पैनगंगा अभयारण्यात आहे तर सी-१ हा ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला आहे. या तीनही वाघांना मार्च २५ आणि २७ मार्च २०१९ दरम्यान रेडीओ कॉलर लावण्यात आले असून वाघांचे परिभ्रमण तपासण्याच्या दृष्टीकोणातून ही बाब महत्त्वपूर्ण ठरली आहे. अभयारण्यातील वाघांच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीकोणातून सध्या महाराष्ट्र वनविभाग आणि  डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टीट्यूट यांच्या सहकार्याने वाघांचे पूर्व विदर्भातील परिभ्रण कसे होत आहे याचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यातंर्गतच या वाघांंना कॉलर आयडी लावण्यात आला आहे. 

डेहराडून येथील या संस्थेचे डॉ. पराग निगम आणि डॉ. बिलाल हबीब आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचे फिल्ड डायरेक्टर हे या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. वाघांचे होणारी भटकंती आणि स्वत:साठी स्वतंत्र टेरीटोरी निर्माण करण्यासाठी त्यांच्या होणाºया हालचाली यावर त्यांची नजर आहे. जुलै महिन्यापासून सी-३ आणि सी-१ वाघाने पांढरकवडा वनविभागाच्या हद्दीतून तेलंगणातील आदिलाबाद भागात स्थालंतर केले. सी-३ तेथून अवघ्या दहा दिवसात परतला. मात्र सी-१ वाघाने त्याचा स्वतंत्र कॉरिडॉर शोधण्यासाठी प्रयत्न चालवले होते. अदिलाबाद, नांदेड डिव्हीजन, पैनगंगा अभयारण्यात काही ठरावीक काळ या वाघाने काढल्यानंतर आॅक्टोबर दरम्यान सी-१ वाघ पुसद परिसरातील इसापूर अभयारण्यात काळी काळ स्थिरावरला. तेथून त्याने हिंगोली, वाशिम, अकोला या जिल्ह्यातील शेतशिवार आणि जंगलामधून  बुलडाणा जिल्ह्यातील घाटबोरी मार्गे ज्ञानगंगा अभयारण्य गाठले. नोव्हेंबर महिन्यापासून घाटावरील भागात सी-१ हा वाघ वास्तव्यास असून आता जैवविविधतेने समृद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात तो पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यातील तब्बल सहा जिल्हे या वाघाने पादाक्रांत करत ज्ञानगंगा अभयारण्य गाठले आहे.

दरम्यान, टिपेश्वरमधील या तीन तरुण वाघांच्या हालचालीवरून वाघांच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य महत्त्वाचे असले तरी येथील वाघांची वाढती संख्या पाहता वाघांना आणखी मोठे जंगल हवे आहे. त्यामुळेच येथील वाघ हे जैवविविधतने समृद्ध अशा अधिवासाच्या शोधात सध्या भटकंती करत असल्याचे गेल्या नऊ महिन्याच्या अभ्यासात समोर येत असल्याचे चित्र आहे. वाईल्ड लाईफ इंस्टीट्यूट आॅफ इंडियाच्या या दीर्घकालीन अभ्यासाच्या आधारावर वाघांचा अधिवास आणि त्यांच्या हालचालीसह त्यांच्या विषयीच्या आणखी काही अज्ञात अशा गोष्टी उजागर होण्याची शक्यता आहे.

प्रामुख्याने वाघांचे नैसर्गिकरित्या होणारे स्थलांतर हा मुद्दा त्याच्या केंद्रस्थानी राहणारा आहे. या वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पांढरकवडा, तेलंगणातील आदिलाबाद, पुसद, वाशिम, अकोला आणि बुलडाणा येथील वन्यजीव व प्रादेशिक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांमधील समन्वय महत्त्वपूर्ण ठरल्याने सी-१ वाघाच्या या १३०० किमी अंतर कापत ज्ञानगंगाअभयारण्यात येण्याचा प्रवास उजागर झाला आहे.

‘ज्ञानगंगा’ सी-१ येण्याची होती प्रतीक्षा

बुलडाणा जिल्ह्यात सी-१ वाघ हा घाटबोरी भागात आल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यातील कर्मचारी, अधिकारी तथा वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक यांनी अनुषंगीक सतर्कता राखली होती. हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात यावा अशी वन्यजीव विभागाची अपेक्षा होती आणि नैसर्गिकरित्या स्थलांतर करत हा वाघ आपसूकच ज्ञानगंगात दाखल झाला आहे.

मानव संघर्ष टाळला

दोन राज्य व सहा जिल्ह्यातून बुलडाण्यात आलेल्या या वाघाने प्रकर्षाने नैसर्गिक प्रवृत्तीनुसार मानवी संघर्ष टाळला आहे. हिंगोली जिल्ह्यात एका गुराला ठार केल्याची घटना वगळता अन्यत्र मानवी संघर्ष या वाघाने टाळला आहे. विशेष म्हणजे हिंगोलीतील अपवाद वगळता हा वाघ पाच जिल्ह्यात कोणाच्या नजरेसही पडला नाही, हे विशेष

Web Title: 'Tipeshwar' tiger reaches Gyananga Ganga sanctuary in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.