भेंडवळची घटमांडणी उद्या
By Admin | Updated: April 27, 2017 13:50 IST2017-04-27T13:50:04+5:302017-04-27T13:50:04+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे.

भेंडवळची घटमांडणी उद्या
खामगाव: वर्षभराचे पाऊस, आपत्ती, राजकीय, संरक्षक व इतर विषयावर भाकीत वर्तविण्यात येत असलेली बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे. तर या मांडणीचे दुसऱ्या दिवशी सकाळी निरीक्षण करुन या मांडणीचे भाकीत वर्तविण्यात येणार आहे. या मांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी जिल्ह्यासोबतच लगतच्या जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित असतात. भेंडवळ येथील वाघ कुटुंबीयातील ११ वी पिढी ही मांडणी करुन भाकीत वर्तवितात. वाघ कुटुंबीयांचे वंशज पुंजाजी वाघ यांना निळावंती विद्या अवगत असल्याने त्यांना पशुपक्ष्यांची भाषा समजत होती, असे सांगण्यात येत असून पुंजाजी महाराजांचा हा घटमांडणी व भाकीत वर्तविण्याचा वारसा वाघ कुटुंबीय चालवित आहे. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी गावानजीकच्या शेतात पाणी भरलेल्या मातीच्या घटाची मांडणी केल्या जाते. या घटाभोवती सांडोळी, कुरडी, अनारसा, करंजी या खाद्यपदार्थांसोबतच सर्व धान्य टाकली जातात. या मांडलेल्या घट, खाद्यपदार्थ व धान्याचे दुसरे दिवशी सकाळी निरीक्षण करुन पुढील वर्षाचे पाऊस, हवामान,नैसर्गिक आपत्ती, राजकीय परिस्थिती याबाबत भाकीत वर्तविण्यात येत असते.