चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: August 28, 2014 00:50 IST2014-08-28T00:01:50+5:302014-08-28T00:50:26+5:30

देऊळगावराजात नऊ दुकाने फोडली : हजारोंचा ऐवज लंपास.

Thunderbolt | चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ

देऊळगावराजा : शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरी वस्त्यांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व्यापार्‍यांची ९ दुकाने फोडून अंदाजे ६४ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बाजार समितीकडे व्यापार्‍यांनी लेखी तक्रार दिली.
बाजार समितीच्या आवारात व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांची माल साठवणूक व दैनंदिन खरेदी विक्री व्यवहार कामासाठी दुकानेवजा गोडावून आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी कामे आटोपल्यावर व्यापारी दुकाने बंद करून घरी गेले. मध्यरात्रीनंतर बुधवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या दम्यान अज्ञात चोरट्यांनी याच दुकानांना लक्ष्य केले. व्यापारी दादा व्यवहारे, शाम धन्नावत, प्रमोद जैन, ओमसेठ धन्नावत, रवि दुगड, अनिल बाहेती, मलकाप्पा लंगोटे, पांडुरंग पवार, राजा सावजी, प्रविण गुप्ता यांच्या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. यापैकी स्वस्तीक ट्रेडर्सचे प्रमोद जैन यांच्या गल्ल्यातील रोख रक्कम ४५ हजार रूपये, शाम धन्नावत यांचे ५ हजार रूपये आणि दादा व्यवहारे यांच्या गल्ल्यातील १४ हजार रूपये असे एकूण ६४ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. आवारातील ९ दुकानांची शटर वाकवण्यात आली तर प्रविण गुप्ता यांचे दुकान फोडण्याचा अपयशी प्रयत्न झाला. बाजार समिती आवारात खाजगी वॉचमन म्हणून काम करणार्‍या अल्पेश गोफणे हे गस्त घालत असतांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील २0 तोळ्याचे चांदीचे कडे बळजबरीने काढून घेतले. याच वॉचमनने चोरीच्या घटनेची माहिती व्यापार्‍यांना दिल्यावर ते सर्वजण घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना ही घटना कळवण्यात आली. ठाणेदार हिवाळे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बाजार समिती प्रशासक गजानन पवार व संचालकांनी सकाळी भेट दिली.व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार भन्साली व सर्व व्यापार्‍यांनी बाजार समितीला लेखी तक्रार देऊन बाजार समिती आवारात बंदुकधारी सुरक्षा गार्ड, प्रकाशाची व्यवस्था, उच्च दर्जाची सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करत चोरीस गेलेल्या मालाची माहिती दिली. सचिव म.तु.शिंगणे यांनी या घटनेबाबत बुधवारी दुपारी पोलिस स्टेशनला तक्रार देत असल्याचे सांगितले. वृत्त लिहिपर्यंंत पो.स्टे.ला लेखी तक्रारच प्राप्त झाली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नव्हता. अज्ञात चोरट्यांनी व्यापार्‍यांच्या दुकानावर हल्लाबोल केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेदरम्यान चिखली रोडवर असलेल्या रमेश झोरे यांच्या अजिंक्य बिअर शॉपीचे शटर तोडून आत प्रवेश केला. यासंदर्भात राहुल झोरे यांनी पो.स्टे.ला तक्रार दिली आहे.

Web Title: Thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.