दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त!

By Admin | Updated: July 21, 2016 23:53 IST2016-07-21T23:53:03+5:302016-07-21T23:53:03+5:30

शासनाचा अहवालानुसार दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त दाखवल्याने ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित.

Threshold income is more in drought! | दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त!

दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त!

विवेक चांदूरकर / बुलडाणा
जिल्ह्यात सातत्याने तीन वर्षांपासून अल्प पावसामुळे दुष्काळ असल्यावरही शासनाच्यावतीने जिल्ह्यातील पिकांचे उंबरठा उत्पन्न जास्त दाखविण्यात आल्याने जिल्ह्यातील कापूस व तूर उत्पादक ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. दुसरीकडे शेतकर्‍यांनी ५0 टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न झाल्यावरही उंबरठा उत्पादन जास्त कसे निघाले? असा आरोप केला आहे.
जिल्ह्यात सन २0१२ पासून अवर्षण होत आहे. तीन वर्षे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने किंवा पावसाने एक ते दीड महिन्याची दडी दिल्याने पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली, तर काही शेतकर्‍यांना दरवर्षीपेक्षा ५0 टक्के कमी उत्पन्न झाले. मात्र, अशी परिस्थिती असतानाही जिल्ह्यात तूर पिकासाठी ५९, तर कापसासाठी ४७ महसूल मंडळांमध्ये उंबरठा उत्पन्न जास्त झाल्याचे शासनाने दाखविले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी ६८00 रुपये दुष्काळी मदत मिळाली. यासोबतच शेतकर्‍यांना पीक विमाही मिळाला. मात्र, शासनाने उंबरठा उत्पन्न जास्त दाखविल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी या दोन्ही दुष्काळी मदत व पीक विम्यापासून वंचित राहिले.

असे निघते उंबरठा उत्पन्न
यावषीर्चे सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यास विमा नुकसानभरपाई मिळत नाही. उंबरठा उत्पन्न हे मागील पाच वर्षाच्या सरासरी गुणीले जोखीमस्तर यानुसार निश्‍चित करतात. पीक विमा नुकसानभरपाईचा लाभ न मिळालेल्या शेतकरी खातेदारांपैकी तूर ५५ हजार ९८८ व कापूस २0 हजार ३४४ या दोन पिकांचे जास्तीत जास्त खातेदार आहेत.

२२९ महसूल मंडळे पीक विम्यापासून वंचित
जिल्ह्यात एकूण कापूस पिकासाठी ४७, तूर पिकासाठी ५९, भुईमूग पिकासाठी १७, तिळासाठी ४0, मूग पिकासाठी २२, उडीद पिकाकरिता ५, सोयाबीनसाठी एक आणि ज्वारी पिकासाठी ३९ महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर नाही. पीक विमा मंजूर नसलेल्या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे पीक विमा नुकसानभरपाईपासून वगळले किंवा वंचित ठेवण्यात आलेले नाही. या महसूल मंडळामध्ये वार्षिक सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यामुळे पीक विमा लागू झालेला नाही.

Web Title: Threshold income is more in drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.