तीन हजार मतदार राहणार मतदानापासून वंचित!
By Admin | Updated: August 18, 2016 00:58 IST2016-08-18T00:58:53+5:302016-08-18T00:58:53+5:30
मेहकर पालिकेत हरकतीचा मुद्दा गाजणार; माजी नगराध्यक्ष जाणार न्यायालयात.

तीन हजार मतदार राहणार मतदानापासून वंचित!
रफिक कुरेशी
मेहकर (जि. बुलडाणा), दि. १७: येथील प्रभाग क्र. २ मधील काही भाग शहराच्या हद्दीबाहेर असल्याचे निवडणूक विभागाने निश्चित केल्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत या भागातील सुमारे तीन हजार नागरिकांना आपल्या पवित्र मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे येथील नागरिकाबरोबरच या प्रभागातील विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
सन २0११ च्या जनगणनेनुसार प्रभाग क्र. २ ची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी असून, मतदार संख्या ४ हजार १९६ एवढी आहे. मागील ३0 वर्षांपासून या भागातील नागरिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावतात.
हा संपूर्ण प्रभाग अधिकृत पालिकेच्या हद्दीत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना मागील ३0 वर्षांपासून नगरपालिका मूलभूत सुविधा पुरवित आहे. सध्या या प्रभागाचे विद्यमान नगराध्यक्ष हसीनाबी कासम गवळी, कल्पना निकस, अशोक अडेलकर आणि संजय जाधव हे नगरसेवक नेतृत्व करीत आहेत.
मागील पाच वर्षांत विद्यमान नगराध्यक्ष हसीनाबी कासम गवळी यांनी या प्रभागामध्ये रस्ते, नाल्या, विद्युत सुविधा, नळयोजना यासह अन्य विकासाची कामे केली. जवळपास ५ कोटी रुपयांची कामे झाल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला आहे. नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नगरपालिकेने नियमानुसार शासनाच्या निकषानुसार शहरातील १२ प्रभागाचे प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर केले. त्यानंतर प्रशासनाने नवीन प्रभाग रचनेवर हरकती मागितल्या. यामध्ये प्रभाग २ मधील प्रभाग रचनेवर काहींनी हरकती घेतल्या.
यामध्ये प्रभाग दोनचा काही भाग हा हद्दीबाहेरचा असल्याचे म्हटले होते. त्यानुसार प्रशासनाने या प्रभागातील जवळपास तीन हजार मतदार हे हद्दीबाहेरचे ठरवून त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला. त्यामुळे मागील ३0 वर्षांपासून पालिकेच्या निवडणुकीत मतदान करणार्या या मतदारांना येणार्या निवडणुकीत मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे.