अल्पवयीन चोरट्याने फोडली तीन दुकाने

By Admin | Updated: April 26, 2017 00:43 IST2017-04-26T00:43:42+5:302017-04-26T00:43:42+5:30

चिखली : शहरातील बस स्थानक परिसरात ३ ते ४ दुकानांचे शटर वाकवून चोरी करणाऱ्या एका १५ वर्षीय बाल गुन्हेगारास सीसीटीव्हीच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले.

Three shops shattered by minor thieves | अल्पवयीन चोरट्याने फोडली तीन दुकाने

अल्पवयीन चोरट्याने फोडली तीन दुकाने

बाल गुन्हेगारास तत्काळ अटक : सीसी कॅमेऱ्यांची मदत

चिखली : शहरातील बस स्थानक परिसरात ३ ते ४ दुकानांचे शटर वाकवून चोरी करणाऱ्या एका १५ वर्षीय बाल गुन्हेगारास सीसीटीव्हीच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शेलूद येथील शिवाजी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे आपले बस स्टँड रोडवरील गॅरेज उघडले असता, गॅरेजमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तसेच गॅरेजच्या पाठीमागील शटर एका बाजूने उचकटलेले दिसून आले. दरम्यान गॅरेजमधील अ‍ॅपेच्या दोन बॅटरी किंमत ८ हजार रुपये व सुमारे १० हजार रुपये किमतीचे दोन सेल आणि एक गस सिलिंडर असा एकूण २० हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी चिखली पोलिसांना दिली.
दरम्यान, परिसरात शोध घेतला असता शिवाजी महाराज चौकातील प्रल्हाद कऱ्हाडे यांचे व बाबूसिंग राजपुरोहित यांच्याही दुकानचे शटर वाकवून त्याचे गल्ल्यातील चिल्लर व नगदी तसेच मोबाइल फोन चोरून नेल्याचे समजले.
दरम्यान, राजपुरोहित यांच्या स्वीट मार्टमधील सीसी कॅमेराची तोडफोड करण्यात आली होती. तर कऱ्हाडे यांच्या राधा टी हाउसमधील सीसीटीव्हीचे २ कॅमेरे काढून टेबलावर ठेवण्यात आले होते. मात्र; हॉटेलमधील ३ रा कॅमेरा आरोपीला काढता न आल्यामुळे त्याचे सर्व कारनामे या कॅमेरामध्ये कैद झाले. विशेष म्हणजे सीसीटीव्हीद्वारे होणारे चित्रीकरण साठवण्यासाठी असलेल्या डी.व्ही.आर.(डीजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) हे उपकरणदेखील चोरण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे दिसून आल्याने या चोरीच्या घटनेतील आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला या नवीन तंत्रज्ञानाबाबत संपूर्ण माहिती होती.
दरम्यान, सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे चिखली पोलिसांनी ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात तातडीने कारवाई करून या गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. या बाल गुन्हेगाराबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शहरातील यापूर्वी घडलेल्या अनेक चोऱ्यांमध्ये त्याचा सहभाग असून, बाल गुन्हेगार असल्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यातून सुटतो.

Web Title: Three shops shattered by minor thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.