बुलडाण्याच्या पालकत्वासाठी तीन आमदारांमध्ये ‘सामना’
By Admin | Updated: June 15, 2016 02:01 IST2016-06-15T02:01:25+5:302016-06-15T02:01:25+5:30
कोणाला मिळणार लाल दिवा ?: आ.भाऊसाहेब फुंडकर, आ.चैनसुख संचेती, आ.संजय कुटे यांची दावेदारी.

बुलडाण्याच्या पालकत्वासाठी तीन आमदारांमध्ये ‘सामना’
गणेश मापारी / खामगाव
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्यासाठी जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ नेत्यांमध्ये चुरस लागली असून यापैकी कुणाला 'लाल दिवा' मिळतो याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने अनाथ झालेल्या जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी भावी मंत्र्यांवरच द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आणि राज्यातील विविध घटकांसाठी चर्चेचा विषय ठरला. यामुळे बुलडाणा जिल्ह्याला पालकमंत्री मुकावा लागला. नाथाभाऊं च्या राजीनाम्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच नव्या पालकमंत्र्याची उत्सुकताही बुलडाणेकरांना लागली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला आता गती आली आहे.
जूनअखेरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आ. भाऊसाहेब फुंडकर, आ.डॉ. संजय कुटे आणि आ. चैनसुख संचेती या तिघांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या माध्यमातून आमदार, तीन वेळा खासदार, प्रदेशाध्यक्ष, दहा वर्षे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेला नेता पक्षासमोर आहे. यासोबत आ. डॉ. संजय कुटे यांचेही नाव समोर येत आहे.
आमदारकीची तिसरी ह्यटर्मह्ण असलेल्या कुटे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी मिळावी, असाही पक्षात मतप्रवाह आहे. या दोन नावांप्रमाणेच जिल्ह्यातील तिसरे नाव चर्चेत आहे ते आ. चैनसुख संचेती यांचे. प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष तसेच सतत पाचव्यांदा मलकापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार्या अनुभवी संचेती यांचे नावही पक्षश्रेष्ठीसमोर येत आहे.
या तिघांपैकी मंत्री कोणीही होवो, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मात्र जिल्ह्यातून मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या मंत्र्याकडेच द्यावे, याबाबत भाजप कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांत मात्र एकमत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षाही नागरिकांना लागली आहे.