केबीसीच्या तीन मुख्य आरोपींना अटक
By Admin | Updated: August 31, 2014 00:20 IST2014-08-31T00:19:39+5:302014-08-31T00:20:34+5:30
केबीसीच्या तीन मुख्य आरोपींना बुलडाणा गुन्हे शाखेद्वारे अटक; ३१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी.

केबीसीच्या तीन मुख्य आरोपींना अटक
बुलडाणा : दाम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कौनल बनेगा करोडपती (केबीसी) कंपनीच्या तीन मुख्य आरोपींना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक येथे शुक्रवारी अटक केली.
राज्यभरात गाजत असलेल्या केबीसी घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब छबू चव्हाण, बापूसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, संजय वामन जगताप, संदीप यशवंतराव जगदाळे, नानासाहेब छबू चव्हाण, साधना बापूसाहेब चव्हाण यांच्याविरूध्द राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झालेले आहेत. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी बापूसाहेब चव्हाण, संजय वामन जगताप व नानासाहेब चव्हाण यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, मलकापूर तालुक्यातील निमखेड येथील गणेश देविदास बुंधे यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली होती. त्यात ३0 महिन्यांत भरलेली ५ लाख ८0 हजार रूपयांची रक्कम दाम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी बापूसाहेब चव्हाण, संजय वामन जगताप व नानासाहेब चव्हाण यांना अटक केली. तसेच ३0 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने पुढील तपासासाठी त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहेत.