बुलडाणा जिल्ह्यात विविध घटनांत तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: July 27, 2016 00:05 IST2016-07-27T00:05:19+5:302016-07-27T00:05:19+5:30
नांदुरा येथे युवक पुलावरून पडला तर खामगाव येथे युवकाला विजेचा धक्क्याने मृत्यू.

बुलडाणा जिल्ह्यात विविध घटनांत तिघांचा मृत्यू
बुलडाणा/खामगाव : खामगाव येथे विजेचा धक्का लागल्याने युवकाचा तसेच बुलडाणा येथे दुचाकीवरून पडल्याने महिलेचा व नांदुरा येथे पुलावरून खाली पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
खामगाव येथे नळावर मोटर लावत असताना विजेचा धक्का लागल्याने ३९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. स्थानिक सामान्य रुग्णालयातील निवासस्थानामध्ये रहिवासी असलेले प्रवीण अशोकराव देशमुख हे पाणी भरण्याकरिता नळाला मोटर लावत होते. दरम्यान, त्यांना विजेचा धक्का लागल्याने ते टाक्यात पडले. ही घटना शेजारच्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी प्रवीण देशमुख यांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता, प्रवीण देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
दुसर्या घटनेत गतिरोधकावरून उसळलेल्या दुचाकीवरून खाली पडल्याने एका साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बुलडाणा शहरातील तानाजी नगर येथील रहिवासी पुष्पा रमेश लामधाडे ही महिला आपल्या मुलासोबत दुचाकीने जानेफळ येथून शहराकडे परत येत होती. दरम्यान, चिखली रोडवरील स्टेट बँकेसमोर येताच मुलाची दुचाकी गतिरोधकावरून उसळल्यामुळे सदर महिला खाली पडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. तिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असतानाच सदर महिलेचा फुलंब्रीजवळ मृत्यू झाला.
नांदुरा येथे पुलावरुन पाय घसरुन नदीपात्रात पडल्याने येथील २0 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नदीला पूर आला असताना गैबी नगरातील रहिवासी शे.बाबर शे.अफसर हा ज्ञानगंगा नदीच्या पुलावर जात होता. पुलावरून पाय घसरुन नदी पात्रात पडल्याने शे. बाबर शे.अफसर (वय २0) याचा पुरात बुडून मृत्यू झाला. याबाबत शेरखान गुलशेरखा यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत पुलावरून पडून तुटलेल्या कठड्यात अडल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, पुलावरील कठडे दुरुस्तीच्या मागणीसाठी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेत ठिय्या आंदोलन केले.