मंत्रिपदापासून वंचित तीन मतदारसंघ
By Admin | Updated: October 29, 2014 00:24 IST2014-10-29T00:24:56+5:302014-10-29T00:24:56+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील भाजपचे तिनही आमदार मंत्रीपदाचे दावेदार.

मंत्रिपदापासून वंचित तीन मतदारसंघ
बुलडाणा : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव, जळगाव जामोद व मलकापूर या तीन मतदारसंघामध्ये कधीही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नाही. काँग्रेसची सत्ता असतानाही या मतदारसंघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही व युती सरकारच्या काळातही हेच चित्र कायम राहिले. यावेळी मात्र राज्यात भाजपाची सत्ता आली असून, या तीनही मतदारसंघात भाजपाचे आमदार विजयी झाले आहे. हे तीनही आमदार पक्षामध्ये मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असल्यामुळे आता मुख्यमंत्री ठरला, मंत्रिपद कुणाला, याची चर्चा जिल्हाभरात जोर धरू लागली आहे.
या तीनही दावेदारांमध्ये विधान परिषदेचे आमदार भाऊसाहेब फुंडकर हे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले आमदार फुंडकर हे भाजपाचा बहुजन चेहरा म्हणून ओळखले जातात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद, पणन महासंघाचे संचालक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, लोकसभा व विधानसभेचे सदस्य व आता विधान परिषदेचे सदस्य असा दीर्घ अनुभव असलेले आ. फुंडकर हे पश्चिम वर्हाडात आपली ताकद ठेवून आहे. यावेळी खामगाव मतदारसंघातून काँग्रेसची सत्ता हद्दपार करीत त्यांनी अँड. आकाश फुंडकर यांना विजय मिळवून दिला व भाजपाचा एक आमदार वाढला त्यामुळे येणार्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. कदाचित मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास ते वरिष्ठ सभागृहाचे सभापती होऊ शकतात, असाही मतप्रवाह भाजपामध्ये आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून जनसंघाचा गड व भाजपाचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मलकापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्या आमदार चैनसुख संचेती यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, ही मागणी पक्षश्रेष्ठीकडे भाजपा कार्यकर्ते करीत आहेत. आमदार चैनसुख संचेती यांनी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावर पक्षाची मजबूत बांधणी केली व वाढवला त्याचबरोबर मतदारसंघात दहा हजार कोटी रुपयांच्या सिंचन योजना खेचून आणल्या आहेत.
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाला आजतागायत मंत्रिपदाचा मान मिळाला नाही. कधी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने संधी हुकली, तर कधी सत्ताधारी गटाच्या आमदाराचा मंत्रिपदासाठी विचारच झाला नाही. यावेळी मात्र डॉ. संजय कुटे यांच्या रूपाने सत्ताधारी भाजपा गटाचे हॅट्ट्रिक करणारे आमदार या मतदारसंघात असल्याने मंत्रिपदाचा लाल दिवा या मतदारसंघात येईल, अशी अपेक्षा या मतदारसंघातील जनता ठेवून आहे.