डोंगरशेवलीत हजारो भक्तांनी घेतले सोमनाथाचे दर्शन
By Admin | Updated: April 11, 2017 00:02 IST2017-04-11T00:02:48+5:302017-04-11T00:02:48+5:30
चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे शेकडो वर्षांपासूनची सोमनाथ महाराजांच्या यात्रेची परंपरा कायम आहे.

डोंगरशेवलीत हजारो भक्तांनी घेतले सोमनाथाचे दर्शन
बुलडाणा : चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे शेकडो वर्षांपासूनची सोमनाथ महाराजांच्या यात्रेची परंपरा कायम आहे. मंदिरावर जाऊन हजारो भाविकांनी सोमनाथाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
डोंगरशेवली येथे दरवर्षी गुढीपाडव्यानंतर बारा दिवसांनी आमली बारसेला सोमनाथ महाराज मंदिरावर संस्थान व गावकर्यांच्यावतीने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंदिराजवळील समाधान सावळे यांच्या शेतात यात्रा भरविण्यात आली होती. शेकडो वर्षांची परंपरा असल्याने भाविक मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. संस्थान व गावकर्यांच्यावतीने २२ क्विंटल गव्हाचा महाप्रसाद बनविण्यात आला होता. सायंकाळी साडेचार वाजता महाप्रसाद वितरित करण्यात आला. चिखली येथील राजू महाराज दर सोमवारी मंदिरावर पूजा करत असल्याने त्यांचे भक्त दूरवरून मंदिरावर आले होते. रात्री ८ वाजेपयर्ंत महाप्रसादाचे शिस्तीत वाटप करण्यात आले.
यावेळी अमडापूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. यात्रेनिमित्त भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. महिला व बाल कल्याण समिती सभापती श्वेता महाले यांच्यासह अनेक मान्यवरांनीदेखील मंदिरावर भेट देऊन दर्शन घेतले. यात्रा संपल्यानंतर दुसर्या दिवशी डोंगर शेवली येथे देवीचे सोंग काढण्यात आले. सावळे परिवारामध्येच हे सोंग देण्याचा मान आहे. यावर्षी बबलू अशोक सावळे यांनी देवीचे सोंग घेतले. सकाळी साडेसात वाजता देवीची पूजा करून गावभर सोंगाची मिरवणूक निघाली. या उत्सवात हिंदू-मुस्लीम समाजाचे लोक सहभागी झाले होते.