उघड्यावर जाणाऱ्यांनी ठोकली धूम!
By Admin | Updated: July 15, 2017 00:06 IST2017-07-15T00:06:43+5:302017-07-15T00:06:43+5:30
मलकापूर : नगर परिषदेच्या गुडमॉर्निंग पथकाने सकाळच्या वेळी नळगंगा नदीपात्र परिसरात धडक देताच अनेकांनी धूम ठोकली.

उघड्यावर जाणाऱ्यांनी ठोकली धूम!
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : नगर परिषदेच्या गुडमॉर्निंग पथकाने सकाळच्या वेळी नळगंगा नदीपात्र परिसरात धडक देताच अनेकांनी धूम ठोकली. यावेळी उघड्यावर शौचास बसण्याकरिता निघालेल्या २४ जणांना टमरेलसह पकडून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले. या मोहिमेमुळे उघड्यावर जाणाऱ्यांची तारांबळ उडून प्रात:विधीची चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र दिसून आले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्याकरिता न.प. प्रशासन धडपडत आहे. गत २ महिन्यांपासून मुख्याधिकारी डॉ.श्रीनिवास कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आले. या पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना हटकणे, सूचना देणे, मार्गदर्शन करणे असे आटोकाट प्रयत्न केले. तरीही या प्रयत्नांना प्रतिसाद न देता अनेकांनी सकाळच्या नित्यक्रमाला सुरुच ठेवले. त्यामुळे शहर हगणदरी मुक्तीवर प्रश्नचिन्ह कायम होते. या बाबीला शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ.कुरे यांनी गांभीर्याने घेत शहर हगणदरीमुक्त अभियानाला कुणी आडवे येत असेल, तर आता ठोस पाऊल उचलून कडक कारवाई करा, अशा सूचना गुडमॉर्निंग पथकाला दिल्या. दरम्यान, १४ जुलै रोजी सकाळी ५.३० ते ७ वाजे दरम्यान नळगंगा नदी पात्र परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या २४ जणांना टमरेलसह पथकाने शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याची कारवाई केली.